आजाराला कंटाळून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानी परिसरात नवीन बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बहादूर सिंग नामक ३० वर्षीय इसमाने, आपल्या आजाराला कंटाळून, गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पवई पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. सदर इसम हा नेपाळ येथील असून, त्याच्या आत्महत्येमागे काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आलेला प्रलय सुद्धा असू शकतो, असा पोलिसांचा अंदाज आहे. पवई पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मंगळवारी सकाळी अज्ञात इसमाने, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला, आदि शंकराचार्य मार्गावरील सॉलीटर इमारती पाठीमागील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेतील झाडीतून दुर्गंधी येत असून, कोणीतरी गळफास लावून घेतले असल्याची माहिती दिली होती. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना, झाडाला लटकलेल्या अवस्थेत ३० वर्षीय इसम आढळून आला. पंचनामा करून, राजावाडी रुग्णालयात त्याच्या केलेल्या शवविच्छेदनात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासी अधिकाऱ्याने ह्या संदर्भात ‘आवर्तन पवईशी’ बोलताना सांगितले कि “आम्हाला घटनास्थळी एका पिशवीत डायरी आढळून आली आहे. त्यात लिहलेल्या मोबाईल नंबरवरील व्यक्तीशी संपर्क साधून बोलावले असता, त्याने मृत इसमास ओळखून, मृताचे नाव बहादूर सिंग आहे असे सांगितले. त्या दोघांची ओळख बांधकाम साईटवर माती उचलताना झाली होती. सिंग हा गेली अनेक महिने पोटाच्या आजाराने त्रस्त होता अशी त्याने माहिती दिली. प्रथमदर्शनी वैदयकीय अहवाल आणि त्याच्या सोबत काम करत असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीवरून त्याने हे कृत्य आजाराला कंटाळून केले असल्याचेच समोर येतेय.”

अधिक बोलताना ते म्हणाले कि “काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या प्रलयानंतर, आपल्या गावी जाण्यासाठी त्याने सुट्टी घेतली होती; परंतु गावी जाण्याऐवजी त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. त्या प्रलयात त्याने आपले सर्वस्वी गमावले असल्याची शक्यता असून, आता मी तरी जगून काय करू? ह्या उद्देशाने सुद्धा त्याने कदाचित आत्महत्या केली असावी, आमचा त्या दिशेनेही तपास चालू असून आम्ही त्याच्या परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत.”

जनतेला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना त्याच्याबद्दल अधिक माहिती असल्यास स्थानिक पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes