विदयार्थी वसतिगृहांच्या छतांना टाळे, विदयार्थ्याच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबई प्रशासनाचा निर्णय

छायाचित्र हक्क: आयआयटी पवई

छायाचित्र हक्क: आयआयटी पवई

केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या जितेश शर्मा नामक २१ वर्षीय विद्यार्थ्याने, कॅम्पसच्या होस्टेल क्रं. १५ च्या छतावर विष​ प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर, आयआयटी मुंबई प्रशासनाने सुरक्षिततेच्या उद्देशाने सर्व होस्टेलच्या छतांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे, विद्यार्थ्यांची मात्र हक्काची विरंगुळ्याची जागा हरवल्याची कुरकुर विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आयआयटी मुंबईच्या संचालकांकडून कॅम्पस भागात विदयार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी, वरिष्ठांची एक समिती सुद्धा स्थापित करण्यात आलेली आहे.

विविध परीक्षांचा सामना करत शेवटी आयआयटीला प्रवेश मिळालेले बरेच विदयार्थी वर्षानुवर्ष आपल्या परिवारापासून दूर असतात. इथे मिळालेले दुसरे विद्यार्थीच त्यांचे मित्र, परिवार असतात आणि अशा मित्र-मित्रपरिवारांची आपली हक्काची जागा असते, ती म्हणजे वसतिगृहाची छते. या छतांवरच अनेकांना जीवाभावाचे मित्र भेटतात, पहिली सिगरेट आणि गप्पा इथेच रंगतात, काहींसाठी दिवसभराच्या धावपळी नंतर विश्रांतीची जागा असते, अनेकांना आप-आपले जोडीदार सुद्धा इथेच मिळतात, तर वरच्या माळ्यावर राहणाऱ्या अनेक विदयार्थ्यांसाठी रात्रीची झोप घेण्याची जागा सुद्धा छतेच असतात. परंतु आता त्या सर्वांच्या आपल्या या सर्व गोष्टींसाठी हक्काची समजली जाणारी जागाच प्रशासनाने बंद केल्यामुळे विदयार्थ्यांच्यात बराच असंतोष आहे.

या संदर्भात ‘आवर्तन पवईशी’ बोलताना एका विदयार्थ्याने सांगितले कि “आम्हा सर्वांची विरंगुळ्याची जागा म्हणजे वसतिगृहाची छते आहेत. त्याच्याशी इथल्या संपूर्ण काळात आमचे एक वेगळेच नाते तयार झालेले असते. संध्याकाळच्या जेवणानंतर आम्ही सर्व मित्र तिथेच भेटतो, गाणी ऐकतो, गप्पा मारतो, सिगारेटचा आस्वाद घेतो, मनमोकळे, स्वच्छंदी बागडतो. परिवारापासून दूर आणि अभ्यासाच्या जाळ्यात गुरफटलेल्या आमच्या सारख्या विदयार्थ्यांसाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत, पण प्रशासन ते सर्व आमच्याकडून हिरावून घेत आहे. वस्तीगृहांची छते बंद करून अशा प्रश्नाचे निवारण होणारे नाही आहे.

बिनाछ्ताचे विदयार्थ्यांचे आयुष्य हे भकास असणार आहे. केवळ काही विदयार्थ्यांच्या मुर्खपणामुळे आणि उचलल्या गेलेल्या चुकीच्या पावलांमुळे संपूर्ण विदयार्थी वर्गाला शिक्षा देणे कितपत योग्य आहे? असा सवाल सुद्धा आता विदयार्थांकडून विचारला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होस्टेल वार्डन्सना आप-आपल्या अखत्यारीतील वसतिगृहांची छते बंद राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच आयआयटी प्रशासनातर्फे वरिष्ठ प्राध्यापक, वसतिगृह अधिकारी आणि विभाग प्रमुखांची एक समिती स्थापित करून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागची कारणे शोधणे आणि उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes