आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत पवईची आस्था शहा भारतात पाचवी

 

सुषमा चव्हाण (sush0705@gmail.com) |

asthaआपल्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे लावून थाटात उभे असणाऱ्या पवईच्या शिरपेचात, अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पवईच्या हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमध्ये शिकणाऱ्या आस्था अमूल शहा या विद्यार्थिनीने आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९८.४०% गुण मिळवून भारतात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या कर्तबगारीमुळे पवईची छाती आज गर्वाने फुलली आहे.

वर्षभर मेहनत करून आयुष्याच्या वळणावर येऊन ठेपलेल्या दहावी आणि बारावीच्या विदयार्थ्यांचे विविध बोर्डांचे परीक्षेचे निकाल यायला सुरवात झाली आहे. आठवडयाच्या सुरवातीलाच आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण १,५८,८३३ विदयार्थी या वर्षी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. ज्यामध्ये ७०,६२४ मुलीं, तर ८८,२०९ मुलांचा समावेश होता. यावर्षी पास होणाऱ्या विदयार्थ्यांचा आकडा ०.२१% वाढला असून मेरीटचे गेल्या ४ वर्षाचे रेकॉर्ड्स सुद्धा मोडीत निघालेले आहेत. या रेकॉर्ड्स तोड स्पर्धेत धावत असताना आस्था शहाने ९८.४०% गुण मिळवून पाचवे स्थान आपल्या नावावर करून घेतले आहे. प्राप्त यशानंतर ‘आवर्तन पवईशी’ मनमुराद गप्पा मारत आस्था शहाने आपल्या सफलतेचे पुस्तक उलगडले.

अगदी बालवाडीपासूनच हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमध्ये शिकणारी आस्था अभ्यासात नेहमीच हुशार होती. वाढत्या वयानुसार तिच्यात समज येत गेली आणि संख्याबळावर जोर न देता गुणवत्तेकडे तिने आपले लक्ष केंद्रित केले. दहावीचा अभ्यास करताना सुद्धा ८-१० तास केवळ रट्टा मारत बसण्यापेक्षा, विषयांची व्यवस्थित मांडणी करून, शाळेच्या दिवसात ३ तास तर सुट्टीच्या दिवसात ४ तास ती अभ्यास करत होती. तिला नेहमी, तिला भावेल अशाच पध्दतीने अभ्यास करणे आवडे. तासनतास अभ्यास करत राहणे म्हणजे तिला रटाळ वाटे, म्हणून तिने ५०/५ अस एक वेगळेच सूत्र बनवले होते. ५०/५ म्हणजे काय? तर ५० मिनिटस कोणत्याही व्यत्ययाशिवाय अभ्यास करायचा आणि ५ ते १० मिनिटे आराम करायचा. अभ्यासा व्यतिरिक्तच्या काळात, आभ्यासात कोणत्या स्थानी आहे आणि अजून काय कमी पडतेय याच्या आकलनात ती आपला वेळ व्यतीत करत होती.

बाह्य किंवा वैयक्तिक क्लासेस बद्दल बोलताना ती म्हणते “चांगल्या मार्कांसाठी ते आवश्यक आहेत. शाळेत अभ्यासक्रमानुसार वेगवेगळ्या स्तरात अनेक प्रकारच्या परीक्षा होतात, त्यांची तयारी करून घेणे, विद्यार्थी नियमित अभ्यास करतात कि नाही या गोष्टीकडे ते जातीने लक्ष देणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजावून देणे, अडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मदत करणे, अशी बरीच जबाबदारी ते स्वीकारतात. क्लासेस होम वर्क करण्याचे दुसरे नाव आहे. म्हणून वैयक्तिक किंवा बाह्य क्लासेस माझ्या मते आवश्यक आहेत.”

शाळेचे तिच्या आयुष्यात नेहमीच वेगळे स्थान राहिले आहे. ती म्हणते “शाळेने कोणतीच परीक्षा अवघड नसते, हे शिक्षा पध्दतीतून समजावून दिले. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आम्हाला घाबरवण्यापेक्षा प्रोत्साहन देण्यात जास्त लक्ष घालत असत. प्रिन्सिपल तर आम्हाला आपल्या मुलांप्रमाणेच समजत असत, आमच्या छोटया छोटया आणि अवघडातल्या अवघड प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्या सहज समजेल अशा भाषेत समजावत असत.”

शालेय जीवनात कॉम्पुटर अप्लिकेशन विषय तिचा नेहमीच आवडीचा होता. तेवढयाच आवडीने ती शेक्सपिअर सुद्धा वाचत असे.

“घरच्यांनी मला नेहमीच पाठींबा दिला. मला काय हवे काय नको या गोष्टींची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. मला जसा अभ्यास करणे पसंत होते, तसेच वातावरण ते घरात ठेवत. त्यांनी नेहमीच मला त्यांच्याकडून जेवढे शक्य होते तेवढे देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कि काय माझ्या या यशानंतर माझ्या पेक्षा त्यांच्या आणि माझ्या मित्रपरिवाराच्या चेहऱ्यावर जास्त समाधान आणि आनंद आहे.”

माझ्या स्वतःच्या अनुभवातून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते “चांगले मार्क मिळवण्यासाठी तासनतास अभ्यास करत बसण्यापेक्षा तुम्हाला जसे आवडेल तसे आणि व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करा, सतत आपण कुठे आहात आणि काय करणे आवश्यक आहे हे टेस्ट द्वारे ठरवा, सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ अभ्यासात डोके खुपसून बसण्यापेक्षा आपल्या आवडीनिवडी जपा, स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा हे सर्वच तुम्हाला तुमच्या सफलतेच्या शिखरावर नेवून पोहचवेल.

डॉक्टर स्टीफेन हॉकिंग, बिल गेट्स, मार्शल माथेर्स यांना आपल्या आयुष्यात आदर्श मानणाऱ्या आस्थाला आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याची इच्छा आहे. म्हणूनच आयुष्यातल्या पहिल्या वळणावर मिळालेल्या या यशाने हुरळून न जाता तिने आता भविष्याच्या तयारीला सुरवात केली आहे. नामवंत महाविद्यालयातून प्रोग्रामिंगच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तिने वाटचाल सुरु केली आहे. आवर्तन पवईतर्फे तिच्या भविष्यातील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes