जे. डे हत्या प्रकरणात दहा आरोपींवर मोक्का अंतर्गत आरोप निश्चित

j deyवरिष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे, यांची पवईमध्ये जून २०११ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत शामिल असलेल्या दहा आरोपींविरुद्ध विशेष मोक्का न्यायालयाने आरोप निश्चित केले असून त्यात महिला पत्रकाराचाही समावेश आहे. विशेष कोर्टाचे न्या. ए. एल. पानसरे यांच्यापुढे हा खटला सुरू आहे. या सर्वां विरुद्ध मोक्का, आयपीसी व अन्य कायद्याखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. सुमारे तीन हजार पानी आरोपपत्र असून त्यात हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. यातील आरोपी हे छोटा राजनच्या संघटीत टोळीचे सदस्य असून त्यांनी राजनच्या इशाऱ्यावरून डे यांची कट रचून हत्या केली आणि पुरावे नष्ट केले या आरोपांनुसार पुढे खटला चालणार आहे.

आपल्या आईला घाटकोपर येथे भेटून, घरी परतत असताना ११ जून, २०११ रोजी, जे. डे यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून हल्लेखोरांनी हिरानंदानी पवईमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. या हत्येचा तपास करताना गुन्हे शाखेने, या प्रकरणी राजन टोळीचा गँगस्टर सतीश तंगप्पन जोसेफ उर्फ सतीश कालिया, अभिजित शिंदे, सचिन गायकवाड, अरुण डाके, अनिल वाघमोडे, मंगेश अगवणे, विनोद असरानी उर्फ विनोद चेंबुर, निलेश शेंडगे, पोल्सन जोसेफ व दीपक सिसोदिया यांना अटक केली होती.

जे. डे यांनी लिहिलेल्या लेखांमुळे छोटा राजन संतापला होता व त्यानेच जे. डे यांच्या हत्येचे आदेश दिल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. डिसेंबर २०११ मध्ये या सर्वांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पुढील तपासात जे. डे यांच्या मोटारसायकलचा नंबर व त्यांचा पत्ता ही माहिती जिग्ना व्होरा या महिला पत्रकाराने दिल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला नोव्हेंबर २०११ मध्ये अटक केली होती व जुलै २०१२ मध्ये तिची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर जिग्ना व्होरा हिच्याविरुद्ध स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आले.

यापैकी जोसेफने डे यांच्यावर गोळया झाडल्या. विनोदने सतीशला डेची ओळख पटवून दिली. व्होराने छोटा राजनला डे यांचे तपशील पुरवले. सिसोदीयाने शस्त्रे गोळा केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली आहे. छोटा राजन आणि नारायण बीश्त या दोघांना फरार आरोपी ठरविण्यात आले आहे, तर विनोदचा आजारपणात मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधातील आरोपांची निश्चिती करण्यात आली नाही.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!