ज्येष्ठ नागरिकांना फसवून लुटणारी टोळी पवई, साकिनाका भागात पुन्हा सक्रीय

लुटेरेशेठला मुलगा झाला आहे, तो बायकांना साडय़ा वाटतोय; आम्ही पोलीस आहोत, पुढे दरोडा पडला आहे दागिने काढून ठेवा; दागिन्यांना पॉलिश करून देतो; बँकेत नोटा मोजून देतो; गॅसची गळती होतेय, त्वरित दुरुस्त केला पाहिजे; अश्या विविध बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणारी टोळी साकिनाका, पवई परिसरात पुन्हा सक्रीय झालेली आहे. साकिनाका भागातील एक वृद्ध महिलेस, शेठला मुलगा झाला आहे; असे सांगून ६० हजार रुपयाचा गंडा घातला आहे. ह्या संदर्भात पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना खबरदारीची सूचना देतानाच परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

साकिनाका परिसरात राहणाऱ्या पार्वती बागूल, एक खासगी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे काही दिवसांपासून त्या घरीच असतात. पाठीमागील आठवडयात त्या काही कामानिमित्त जात असताना दोन तरुण इसमांनी त्यांना अडवले. या भागातील सेठना मुलगा झालाय, तो बायकांना साडय़ा वाटतोय, असे त्यांनी सांगितले. तुमच्या हातातील बांगडय़ा पाहून तो तुम्हाला साडय़ा देणार नाही, असे सांगत जबरदस्तीने बागूल यांच्या हातातील बांगडय़ा काढून घेतल्या.

हा काय प्रकार आहे ते सुरुवातीला बागूल यांना समजलेच नाही. मला साडी नको आहे; असे सांगत त्या नकार देत असतानाच, या दोन भामटय़ांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा काढून घेतल्या आणि पळ काढला. या बांगडय़ांची किंमत ६० हजार रुपये एवढी आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बागूल यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. साकीनाका पोलीस या दोन भामटय़ांचा तपास करत आहेत.

ह्या बद्दल ‘आवर्तन पवईशी’ बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले “पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयोवृद्ध नागरिकांना आम्ही अशाप्रकारे लुबाडणाऱ्या विविध टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे”.

“आम्ही पोलीस आहोत, पुढे दरोडा पडला आहे दागिने काढून ठेवा, असे सांगत ते दागिने हातचलाखीने लुबाडणे; दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून दागिने पळवणे; बँकेच्या बाहेर वृद्धांना नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने लुबाडणे अशा त्यांच्या काम करण्याच्या विविध पद्धती आहेत.”

पोलिसांच्या जेष्ठ नागरिकांसाठी काही विशेष सूचना

* साध्या वेषात रस्त्यात भेटलेल्या पोलिसांवर त्वरित विश्वास न ठेवता त्याबाबत खात्री करून घ्यावी

* सोन्याचे दागिने घालून ज्येष्ठ नागरिकांनी एकटय़ाने बाहेर जाऊ नये

* अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नये

* घरात एकटे असताना अनोळखी माणसांना घरात घेऊ नये

* देवळात जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना मोल्यवान वस्तू घालू नये

* अनिष्ट प्रकार किंवा संकट ओढवल्यास मुंबई पोलिसांच्या १०३ अथवा १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes