पवईत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात मॅकॅनिकला अटक

१६ एक्टिवा मोटरसायकल आणि १ कार हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
bike chori

                          हस्तगत करण्यात आलेल्या गाड्या

पवई | प्रतिनिधी:

वई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून आतापर्यंत १६ एक्टिवा मोटरसायकल आणि एक कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटक आरोपीचे नाव खान (संपूर्ण नाव राखीव) आहे. तो पार्कसाईट, कैलाश कॉम्प्लेक्स येथे राहतो आणि रस्त्यावर मॅकॅनिकचे काम करतो. पवई पोलीस सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे अधिक तपास करत असून, तो अजून ही बऱ्याच गुन्ह्याची उकल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पवई, चांदिवली आणि साकिनाका हद्दीत गेल्या काही महिन्यात गाड्या चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ हिरानंदानी भागातून गेल्या सहा ते सात महिन्यात १८ ते २० गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पवई पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात ३९ गाड्यांच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यात एक्टिवा गाडीला चोरांकडून प्राधान्य देण्यात आले होते. परिसरांमधून प्रत्येक महिन्याला ८-१० गाड्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे खास पोलीस पथके यांना रोखण्यासाठी आणि मुसक्या आवळण्यासाठी तयार केली गेली होती.

पवई पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी मुजावर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पथकाला याबाबत काही धागेदोरे हाती लागले आणि त्यांनी या गुन्ह्यात एका मॅकॅनिकला अटक करत या गुन्ह्याची उकल केली आहे.

या बाबत बोलताना तपासी अधिकारी पोलिस उप-निरीक्षक समीर मुजावर यांनी आवर्तन पवईला सांगितले, “मोटरसायकल चोरणाऱ्या गुन्हेगारांनी परिसरात धुमाकूळ घातला होता. आम्ही सर्व प्रकारे खबरदारी घेऊन सुद्धा गुन्हे घडतच होते. आम्ही गुन्ह्याची पध्दती आणि वेळ यांचा अभ्यास केला असता काही विशिष्ट गोष्टी समोर आल्या. लागलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही चार दिवस चोवीस तास वेशांतर करून ठिकठिकाणी अदलून बदलून पाळत ठेवली आणि खान आमच्या हाती लागला. त्याच्याकडून आम्ही १६ एक्टिवा मोटरसायकल आणि एक कार ताब्यात घेतली आहे. त्याच्याकडे अधिक तपास करत असून तो अजून ही गुन्ह्यांची माहिती देण्याची शक्यता आहे.”

“खान हा मॅकॅनिकचे काम रस्त्यांवर करत होता. जिथे गाडी बंद पडेल तेथे जावून काम करायचा. दुरुस्तीला आलेल्या अनेक गाड्या तो रस्त्यावरच उभा करत असे, त्यामुळे त्याच्यावर कोणालाच शंका येत नव्हती. चोरीच्या गाड्या ज्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा त्याने रस्त्यांवरच उभ्या करून ठेवल्या होत्या. नंबर प्लेट बदलून, गाडीचा चेसी नंबर खराब करून ठेवल्याने त्याचे मालक आणि पोलीसांना सुद्धा गाडी ओळखणे अवघड होते. पण त्याच्या या हालचालीची खबर आम्हाला मिळाली आणि त्याचे सगळे पितळ उघडे पडले. तो पटाईत असल्याने ३ मिनिटाच्या आत गाडी डायरेक्ट करून घेऊन निघून जात असे, त्यामुळे परिसरात त्याचा वावर पण जाणवत नसे. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवूनच त्याला पकडणे आवश्यक होते.” असे अजून एका अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले “अजून ही काही मोटरसायकल आणि कार चोरीच्या गुन्ह्यात याचा हात असण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहन चोरीत एक मोठी टिम काम करत असून हा त्यांच्यापैकीच एक असण्याची शक्यता सुद्धा आहे. शिवाय या कामात त्याला मदत करणारे त्याचे इतर साथीदार ही असण्याची शक्यता आहे त्या दिशेने आम्ही तपास करत आहोत. लवकरच वाहन चोरीच्या गुन्ह्यातील मोठी उकल होऊन या गुन्ह्याला जबर बसवण्यास यश मिळेल”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!