पवईत सापडलेली चिमुरडी परतली स्वगृही

20170320-005821.jpg

वईत चांदशहावाली जत्रेच्या दरम्यान पवई पोलिसांना सापडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या परिवाराचा शोध काढत पवई पोलिसांनी तिला सुखरूप स्वगृही परतवले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी तिचे वडील विनोद शेंडे यांच्या ताब्यात मुलीला सुपूर्द केले.

एका महिन्यात तिसऱ्यांदा पवई पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत २४ तासाच्या आत परिवार पुनर्मिलन घडवले आहे. यापूर्वी हिरानंदानी येथील शाळेतून गायब झालेल्या मुलीला तर गेल्या आठवड्यात तुंगा येथून अपहरण करून नेलेल्या चिमुरडयाला पवई पोलिसांनी शोधून काढत सुखरूप घरी परतवले होतेे.

गेल्या आठवड्यात पवई येथील चांदशहावाली बाबा दर्ग्याजवळ दरवर्षी प्रमाणे मोठी जत्रा भरली होती. याठिकाणी बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असताना पवई पोलिसांना एक सहा वर्षाची मुलगी भेदरलेली व रडत असताना आढळून आली. तिच्या बाबत आसपास चौकशी करून सुद्धा कोणीच तिला ओळखत नसल्याने अखेर तिला पवई पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

“आम्ही तिला शांत करून विश्वासात घेवून तिच्याबद्दल माहिती विचारली असता, तिचे नाव तन्मयी विनोद शेंडे असून, गोंदिया, बुलढाणा, विरार, कल्याण अशा काही ठिकाणांची नावे ती सांगत होती. याव्यतिरिक्त तिला काहीच माहिती नव्हते” असे तपासी अधिकारी महिला पोलीस उप-निरीक्षक कविता नाईक यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही त्वरित सोशल नेटवर्कवर तिची माहिती प्रसिद्ध करून तिने सांगितलेल्या सर्व ठिकाणच्या पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस ठाणे व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधत तिच्या किंवा तिच्या परिवाराबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. याच प्रयत्नांना यश येत गोंदियामधून आम्हाला तिच्या वडिलांबद्दल ते कल्याणला राहत असल्याची माहिती मिळाली. तेथून त्यांची माहिती मिळवत, पोलीस ठाण्याला बोलवून तन्मयीला आम्ही त्यांच्या सुपूर्द केले आहे.”

कशी हरवली तन्मयी

आई-वडील वेगळे झाल्याने तन्मयी ही वडिलांसोबत राहते तर तिचा भाऊ हा आई सोबत राहतो. गुरुवारी बांद्रा येथून एका व्यक्तीकडून तन्मयीच्या वडिलांना काही पैसे मिळणार असल्याने ते तिला घेवून अंधेरी येथे आले होते. तिथे आपल्या ओळखीतल्या एका महिलेकडे तिला सुपूर्द करून एका तासात येतो सांगून ते पुढे निघून गेले. संध्याकाळी ते त्या महिलेकडे परतले असता, अंधेरी येथे महिला आणि तन्मयी यांच्यात चुकामुक होऊन ती हरवली असल्याचे तिने सांगितले. ज्यानंतर संपूर्ण परिसरात तिचा शोध घेतला गेला मात्र ती मिळून आली नाही. अखेर याबाबत तक्रार नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला निघाले असतानाच ती पवईमध्ये मिळून आल्याचा पवई पोलिसांचा फोन आल्याने अखेर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, तन्मयी अंधेरी येथून पवईला कशी पोहचली हे अजून गुलदस्त्यातच असून स्वतः तिलाही याबाबत काहीच आठवत नाही.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes