पवईत होळीला गालबोट; एकाचा खून तर एकाची आत्महत्या

@रविराज शिंदे

सोमवारी होळीच्या मुहूर्तावर किरकोळ वादातून पवईतील पेरूबाग येथे डोक्यात आणि मांडीत बिअरच्या बाटल्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. तर इंदिरानगर येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन हेमाडे (२०) असे खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याच गुन्ह्यात पवई पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत इंदिरानगर येथील तरुणाच्या आत्महत्येमागच्या कारणाचा पवई पोलीस शोध घेत आहेत.

नंदू कराडे (२२), संजय कराडे (२०), प्रशांत हरिश्चंद्र कॉपी (१८), गीता कराडे (४०) अशी खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सचिन (२०) व त्याचा भाऊ रुपेश (२२) हे पेरूबाग, टेकडी परिसरात होळी खेळत असताना त्यांनी आरोपीतां पैकी एकाच्या बहिणीला मोबाईल नंबर मागितला. ज्याला स्पष्ट नकार देत तिने आपल्या भावास याबाबत माहिती देताच अटक आरोपींनी सचिन याला लाथाबुक्यांनी मारहाण करत आणि डोक्यात आणि मांडीत बिअरची बॉटल मारून गंभीर जखमी केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सचिनला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सोमवारी सकाळी पवई पोलिसांनी चारही आरोपीना अटक करून कोर्टात हजर केले असता आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात धुळवड खेळून रात्री उशीरा राहत्या घरी जावून एका २४ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पवईतील इंदिरानगरमध्ये घडली. श्रीकांत मलकारी (२४) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव असून, तो डंपर चालकाच काम करत होता. सोमवारी सकाळीच श्रीकांत मित्रांसोबत रंगपंचमी खेळण्यासाठी बाहेर गेला होता. रात्री उशिरा तो घरी परतला आणि घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

“दिवसभरात कोणाशी वादविवाद झाला का? कोणत्या कारणास्तव श्रीकांतने आत्महत्या केली याचा आम्ही तपास करत आहोत” असे यावेळी बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes