पवईमध्ये पुन्हा भडकली आग, कोणतीही मोठी हानी नाही

fireपवईच्या लेक होम बिल्डिंगला लागलेल्या आगीला एक आठवडा पूर्ण होतोय कि नाही, तोपर्यंत पवईमधील एस एम शेट्टी शाळेजवळील म्हाडाच्या इमारतीमध्ये एका घरात मंगळवारी सकाळी देवासमोर ठेवलेला आरतीच्या दिव्याची ज्योत कपड्याला लागल्याने आग लागली. रहिवाश्यांची सावधानता आणि घटनेची माहिती मिळताच त्वरित पोहचलेल्या अग्निशमन दलामुळे काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, केवळ घरातील देव्हाऱ्या जवळचा काही भाग जळाला आहे असे पवई पोलिसांनी सांगितले.

मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून अग्नितांडव सुरु आहे. मुंबईच्या विविध भागात लागलेल्या आगींमध्ये अनेक लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. गेल्या आठवड्यात पवईच्या लेकहोम परिसरातील २१ मजली इमारतीला लागलेल्या आगीत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. या व्यतिरिक्त मानसिक आणि आर्थिक हानीचे प्रमाण ही खूप मोठे आहे. या घटनेने घायाळ झालेल्या पवईकरांच्या जखमा अजून सुकल्याही नसतील कि पवईच्या म्हाडा वसाहत नंबर २४च्या, सातव्या मजल्यावर मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. रहिवाश्यांनी माहिती मिळताच त्वरित इमारत खाली केली आणि सुरक्षित स्थळी पोहचले.

याबाबत बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ‘आवर्तन पवईला’ सांगितले “सकाळी ९.५० दरम्यान आगीच्या घटनेची सूचना मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल दोघे ही झटपट घटनास्थळी दाखल झाले आणि काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवले गेले. वेळेत नियंत्रण मिळवल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मोठी वित्तीय हानी झालेली नसून केवळ देवघरातील काही भाग जळाला आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी या बाबत बोलताना सांगितले की “घरातील देव्हाऱ्यात पूजेनंतर जळत्या अवस्थेत असलेल्या दिव्याला उघड्या खिडकीमुळे हवा मिळाली आणि देवघरात ठेवलेल्या कपड्यापर्यंत ती पोहचली आणि कपड्याने पेट घेतल्यामुळे आग पसरली; आगीची सूचना मिळताच झटपट अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवित किंवा मोठी हानी झालेली नाही.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes