पवई लेक होममधील भीषण आगीत ७ लोकांचा मृत्यू, २२ पेक्षा जास्त जखमी

छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्‍स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले असून,  उर्वरीत जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थाळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे जवान आणि पंधरा बंबांच्या ताफ्याच्या सहाय्याने, साडेतीन तास चाललेल्या बचावकार्यानंतर, इमारतीत अडकून पडलेल्या सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

रात्री उशिरा हाती आलेल्या बातमीनुसार मृतांमध्ये अमर सरकार (३0), अश्‍विन भाटीया (५३), पवईतील मन्नुभाई चाळीत राहणारा तौशिफ, बाबू लोहार (२५) आणि सोनी अशी काही नावे समोर आली आहेत. दुर्घटनेतील जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश आहे.

IMG_20150606_182050

छायाचित्र: सिद्धार्थ शिरसट

या बाबत पवई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार “गगनचुंबी इमारतींची वस्ती असणाऱ्या लेक होमच्या फेज ३ मधील २१ मजली इमारत, लेक लुक्रीनच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली असल्याची माहिती एका स्थानिक महिलेने पोलिसांना शनिवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास दिली. त्याची दाखल घेत आमचा एक अधिकारी आणि शिपाई असे दोघे तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि काही वेळातच संपूर्ण टीम. तो पर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. आगीचे लोट पंधराव्या मजल्यापर्यंत पोहचले होते. झटपट संपूर्ण इमारतीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले; परंतु आग लागलेल्या चौदाव्या मजल्याच्या वरच्या काही मजल्यावर बरेच लोक अडकून पडले होते. घटनास्थळी त्वरितच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या सुरवातीला दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अडकून पडलेल्या अनेक नागरिकांना पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. ज्यात जखमी आणि मृतांचा ही समावेश आहे.”

लिफ्टचा वापर जीवावर बेतला

या संदर्भात माध्यमांशी बोलताना अग्निशमन दल प्रमुख पी एस रहांदळे यांनी सांगितले कि “आमच्यातर्फे बऱ्याच लोकांना सुखरूप रित्या बाहेर काढण्यात आले आहे. ज्यात अनेक जखमी होते. आगीच्या घटनेने धावपळ करणाऱ्या काही लोकांनी साधे नियम मोडून लिफ्टचा वापर केला. त्याच वेळी विद्यत पुरवठा खंडित झाल्याने ते मध्येच अडकून पडले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या इमारतीतून आगीवर नियंत्रण

इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाने मुख्य इमारत आणि त्याच्या आसपासच्या इमारतीच्या छतांवर चढून आग विझवणे आणि बचावकार्य सुरु केले होते. त्यामुळे वरच्या मजल्यांवर फ्लॅटमध्ये अडकून पडलेल्या अनेक रहिवाशांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले. आग लागल्यानंतर गडबडीत लिफ्टमध्ये शिरलेले काही लोक मृत्युमुखी पडल्याचे अग्निशमन जवानांना सापडले.

या संदर्भात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये इलेक्ट्रिसीअन, ड्राईव्हर आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.

या आगीच्या वृत्ताने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून शेजारील इमारतीतील अनेक रहिवाश्यांनी रात्री आपले बस्तान मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्याकडेच घातले.

या संदर्भात शेवटची बातमी हाती येई पर्यंत आगीचे नक्की कारण समजले नव्हते. एसीमधून निघालेल्या ठिणगीतून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या संदर्भात तपास चालू होता.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!