फॉरेस्ट क्लबच्या पाठीमागील भागात वणवा पेटला, जिवीत किंवा वित्तीय नुकसान नाही

IMG_0282पाठीमागील आठवडयात हिरानंदानी फॉरेस्ट क्लबच्या पाठीमागील भागात, स्थानिक नागरिकांना वॉकसाठी बनवलेल्या परिसरात लावलेल्या वनराईतील, धुम्रपान करणाऱ्या अज्ञात इसमाने पाठीमागे सोडलेल्या ठिणगीमुळे, सुकलेली झाडाची पाने आणि फांदया यांनी अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या कमांडो आणि मुंबई अग्निशमन दलाच्या मदतीने काही काळातच आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जिवीत किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. या परिसरात घडलेली आगीची ही तिसरी घटना आहे. अशाप्रकारे सतत घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे, स्थानिकांसाठी उभारण्यात आलेले बगीचे, वनराई आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बनवलेल्या जागेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या उन्हाने अंगाची काहिली होत असून वातावरणात एक प्रकारची उष्णता निर्माण झालेली आहे. अशा वातावरणात, मुंबईकर काम नसेल तर घरी राहणेच पसंत करतोय. जे काही कामामुळे बाहेर असतात, ते दुपारच्या वेळी झाडांच्या सावलीत किंवा एखादया बागेचा, वनराईचा आसरा घेत आहेत. अशावेळी जर त्या ठिकाणी एखादा बिकट प्रसंग ओढवला तर काय होईल? विचार करा. असेच काहीसे पाठीमागील आठवडयात हिरानंदानी फॉरेस्ट क्लबच्या पाठीमागे लोकांना जॉगिंगसाठी बनवलेल्या वनभागात घडले आहे. धुम्रपान करणाऱ्या अज्ञात इसमाने पाठीमागे सोडलेल्या ठिणगीमुळे, जमिनीवर पडलेल्या झाडांच्या सुकलेल्या फांदयानी आणि पानांनी अचानक पेट घेतल्याने बघताबघता संपूर्ण भागात आग पसरली. त्यावेळी उन्हापासून बचावासाठी आणि गप्पा मारण्यासाठी तिथे उपस्थित लोकांची मात्र या घटनेने त्रेधातिरपीट उडाली होती. तेवढयातसुद्धा भान ठेवून एक स्थानिक नागरिक हरीश आय्यर यांनी मुंबई अग्निशमन दल आणि स्थानिक कमांडोना घटनेची माहिती दिली.

आगीची माहिती मिळताच कमांडोनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली, परंतु तिथे कोणत्याही प्रकारची आग नियंत्रण यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे, शेवटी जवळपास असलेली माती आणि शेजारीच असलेल्या शाळेच्या आवारातील नळातून पाणी वापरून अग्निशमन दल येईपर्यंत आगीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीला पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आले.

स्थानिकांच्या आणि इथे येणाऱ्या लोकांच्या मते या परिसरातील ही तिसरी आगीची घटना आहे. त्यांच्यातर्फे महानगरपालिका आणि स्थानिक जबाबदार संस्था यांना या परिसरात साचणारी सुखी पाने, फांदया आणि कचरा हटवण्यासाठी वेळोवेळी कळविण्यात आले आहे. तरीही त्यांच्याकडून कोणतीही पाऊले उचलली जात नसल्यामुळे अशा  घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचे पंप सुद्धा आगीच्या ठिकाणापासून खूप दूरच्या भागात असून तिथून या परिसरात पाईप लावून पाणी घेवून येणे शक्य नाही. आग लागल्यावर पर्यायी व्यवस्थेच्या नावावर काहीच सुविधा इथे नसल्याने आमची ही हक्काची ठिकाणे दिवसेंनदिवस धोकादायक होत चालली आहेत, असाही त्यांच्यातर्फे बोलले जात आहे.

या संदर्भात हिरानंदानी व्यवस्थापनाशी बोलले असता त्यांनी ‘आवर्तन पवईला’ सांगितले कि “आसपासच्या परिसरातील काही संस्था आपला कचरा त्या भागात टाकत आहेत, त्यांना रोखण्यासाठी आम्ही त्या भागात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तसेच आमच्या गार्डनिंग विभागाला तिथे कोणत्याही प्रकारचा सुखा कचरा जमा करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. वेळोवेळी तिथे जमा होणाऱ्या पानांची आणि फांदयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. त्याभागात धुम्रपान करताना कोणी आढळल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश सुद्धा आमच्यातर्फे दिलेले आहेत. त्यामुळे तो भाग आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झालेला आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही.”

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes