जेट एयरवेजचे शिल्पकार सरोज दत्ता यांचे पवईच्या राहत्या घरी निधन

dattaजेट एयरवेजचे शिल्पकार आणि कार्यकारी संचालक सरोज दत्ता (७९) यांचे पवईच्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांनी जेट एयरवेजला जगातील दुसऱ्या स्थानावरची खाजगी एअरलाईन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. १० तारखेला दिवसभर फोन उचलत नसल्याने आणि घराचा दरवाजाही उघडत नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांना सूचना दिली होती. डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडल्या नंतर ते बाथरूम मध्ये निश्चल अवस्थेत आढळून आले होते. हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासानंतर त्यांना मृत घोषित केले.

जेट एयरवेज हे नाव आज कोणास माहित नाही असे कोणीच नसेल. हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यात सरोज दत्ता यांचे नाव सर्वात वरती गणले जाते. १९९३ – २०११ या कालावधीत कार्यकारी संचालक म्हणून जेट एयरवेजला त्यांनी नेहमी अग्रस्थानी राखण्याचे काम केले होते. निवृत्त झाल्यापासून ते पवई येथील आपल्या सध्याच्या घरी एकटेच राहत होते. एक कायमस्वरूपी मदतनीस त्यांच्या सोबत असे; परंतु त्यांच्या मृत्युच्या वेळेस तो हि रजेवर होता.

याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलिसांनी सांगितले कि, दत्ता यांच्या ड्रायवरने दिलेल्या जवाबानुसार, त्यांना हृदयविकाराचा त्रास होता ज्यावर ते कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत होते. ९ तारखेला त्यांना अस्वस्थ जाणवत असल्याने ते रुग्णालयातून तपासणी करून घरी आले होते आणि ते घरी एकटेच होते. १० तारखेला जेव्हा तो पुन्हा सकाळी कामावर हजर झाला तेव्हा त्याने बेल वाजवली परंतु दत्तानी कसलाच प्रतिसाद दिला नाही, तेव्हा कदाचित साहेब झोपले असतील म्हणून तो परत खाली जावून बसला आणि काही वेळाने पुन्हा वर जावून बेल मारली पण तेव्हाही त्याला कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दत्ता यांच्या पुतण्याला याबाबत खबर दिली. त्याने ही अनेक वेळा फोन केले पण दत्तांचा कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी अखेर पवई पोलीस स्टेशनला येऊन तशी माहिती दिली.

पोलीस अधिकारी पुढे म्हणाले कि, घटनास्थळी दाखल झाल्यावर चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावून घर उघडले गेले तेव्हा घरात बाथरूममध्ये दत्ता अर्धवट खुल्या दरवाजाला पाय लागलेल्या अवस्थेत निश्चल पडलेले दिसून आले. दरवाजा उघडता येत नसल्यामुळे सुताराला बोलावून दरवाजा मोकळा करून आम्ही दत्ताना बाहेर काढले आणि हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलावून तपासणी केली असता त्यांनी त्यांचा मृत्यू झाले असल्याचे स्पष्ट केले.

राजावाडी रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केले गेले असून हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले, असे पवई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब शिंदे यांनी आवर्तन पवईला सांगितले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes