काल आलेल्या बारावीच्या परिक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर आपण नापास झालो आहोत हे समजताच साकिनाका पोलिस वसाहतीत राहणारी संध्या पवार (बदललेले नाव) हिने निराशेतून आपल्या राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिचे वडील पोलिस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आत्महत्येच्या वेळेस संध्याच्या बहिणीने तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता; परंतु तिचा हात झटकून देत उडी मारली. या घटनेनंतर साकिनाका पोलिस वसाहतीत शोककळा पसरली असून साकिनाका पोलिसांनी बहिण व वडीलांचा जवाब नोंद केला आहे.
पोलिस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले पवार हे आपल्या कुटूंबासह साकिनाका पोलिस वसाहतीत राहतात. त्यांना दोन मुली असून त्यापैकी संध्या ही बारावीत शिकत होती. बुधवारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला होता. ऑनलाईन निकाल पाहिल्यावर आपण नापास झालो आहोत हे समजल्यापासून ती प्रचंड मानसिक तणावात होती. शेवटी असह्य झालेल्या संध्याने राहत्या बिल्डिंगच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केली. संध्याच्या पाठी पाठी गेलेल्या तिच्या बहिणीने तिला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र तिचा हात झटकून खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या संध्याला तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
या संदर्भात माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्याचे पालक आणि बहिण यांनी तिने हे कृत्य नैराश्यातून केले असल्याचा पोलिसांना जवाब दिला आहे.
No comments yet.