हि दोस्ती तुटायची नाही, मृत्यूशी झुंजताना सुद्धा दिली एकमेकांची साथ

toushif and babu‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे’ हे शब्द कानावर पडताच समोर चित्र उभे राहते ते शोले मधील जय (अमिताभ बच्चन) आणि विरू (धर्मेंद्र) यांच्या मैत्रीचे. अशीच एक मैत्री पवईत वाढली आणि शनिवारी पवईच्या अग्नी तांडवात मृत्यू सोबत पण टिकून राहिली. ही कहाणी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून लेक होममध्ये लागलेल्या आगीत लोकांचे जीव वाचवताना मृत्यूला आलिंगन दिलेल्या तौसीफ शेख आणि बाबू लोहारची आहे. जिवंतपणी मित्र असणाऱ्या या दोघांनी मृत्युच्या प्रसंगी पण एकमेकांची साथ सोडली नाही आणि मृत्यूशी लढा देत दोघांनीही प्राण सोडले. रविवारी घरी आणलेल्या त्यांच्या शवाकडे बघून प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द होते, मैत्री असावी तर अशी.

अनेक चित्रपटात मैत्रीचे अनेक किस्से पहायला मिळतात. कोणताच कवी असा नसेल ज्याने या विषयावर कविता केली नसेल किंवा कोणीच व्यक्ती असा नसेल ज्याला मित्र नाही. रक्ताच्या नात्यानंतर ज्या नात्याला सर्वात जास्त महत्व मिळाले आहे ते नाते म्हणजे मैत्री. या नात्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. तौसीफ आणि बाबूच्या या मैत्रीच्या उदाहरणाने तर या नात्यातले घट्टपण अजून पक्के करून ठेवले आहे.

तौसीफ हा परिसरात समाजसेवेच्या कार्यामुळे ओळखला जात होता. बाबू लोहारची ओळख सुद्धा तौसीफसोबत याच कारणामुळे झाली होती, नंतर त्याचे रुपांतर मैत्रीत झाले.

त्यांच्यासोबत बचाव कार्यात सहभागी असलेल्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी तौसीफ आपल्या परिसरातच असताना त्याला समोरच असणाऱ्या लेक होममध्ये लागलेली आग दिसली. क्षणाचाही विलंब न करता तो तिथे पोहचला तेव्हा लेक लुसर्न इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्याकडे ड्रायवर म्हणून काम करणारा बाबू आपले काम संपवून घरी जायला निघाला होता. तौसिफला तिथे बघताच त्यानेही इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी जाण्याचे ठरवले आणि दोघांनीही पहिल्या फेरीत लिफ्टच्या सहाय्याने काही नागरिकांना सुखरूप खाली आणले. दुसऱ्या फेरीत सुद्धा ते लिफ्ट ने अजून काही लोकांना वाचवण्यात यशस्वी झाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. लिफ्टमुळे ते पटापट लोकांची सुटका करण्यात यशस्वी होत होते म्हणून त्यांनी पुन्हा तिसऱ्या वेळेस सुद्धा लिफ्टचा वापर केला आणि त्याच प्रसंगी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ते लिफ्टमध्येच अडकले आणि धुरात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्यांना ते दोघे मृत अवस्थेत लिफ्टमध्ये आढळून आले.

तौसिफच्या मदतीच्या आणि समाजसेवेच्या व्यक्तिमत्वाबाबत सगळेच जाणून होते म्हणूनच बाबूसुद्धा मित्राच्या बरोबरीने या कार्यात सहभागी झाला होता. त्यांना मिळणाऱ्या सफलतेने ते प्रेरित होते आणि एकमेकांच्या साथीने त्यांनी अनेकांचे जीव वाचवले सुद्धा पण काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि दोघांनीही एकसाथ मृत्यूला झुंज दिली पण त्यात ते सफल झाले नाही आणि लिफ्टमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या पराक्रमाने प्रेरित त्यांच्या इतर काही मित्रांनी नेहमी मदतीला तत्पर असणाऱ्या आणि मैत्रीचे एक जिवंत उदाहरण असलेल्या आपल्या या मित्रांच्या परिवाराला मदत करण्यासाठी निधी जमा करायचे ठरवले असून आता ते त्या कार्यात गुंतले आहेत.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!