अजून एक दिशाहिन बंदुकीची गोळी हिरानंदानीत

1दिशाहीन बंदुकीच्या गोळीने टोरीनो इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला आपले शिकार बनवण्याच्या घटनेला एक आठवडाही उलटला नसेल कि, अजून एक अशीच दिशाहीन गोळी हिरानंदानीतील एवलॉन इमारतीत २६व्या मजल्यावरील घरातील बाथरूममध्ये पोहचली. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र बैलेस्टिक तज्ञांनी पाहणी करून, मिळालेली गोळी ही जवळच्या अंतरावरून आल्याचे सांगितल्याने ही गोळी नक्की कोठून आली? असा एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

१९८० च्या उत्तरार्धात घाटकोपर भटवाडी येथे बनवण्यात आलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दिशाहीन झालेल्या बंदुकीच्या गोळ्या गेल्या अनेक वर्षापासून हिरानंदानी, आयआयटी, आदिशंकराचार्य मार्ग येथे येत आहेत. अशाच एका दिशाहीन गोळीने १९ जानेवारी रोजी सुरक्षारक्षकाला आपले शिकार बनवल्यानंतर, २२ जानेवारीला पुन्हा एकदा अशाच एका गोळीने हिरानंदानीतील एवलॉन इमारतीच्या २६व्या मजल्यावरील दाहीया यांच्या घरातील बाथरूमची सुरक्षा जाळी व खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. या प्रकारामुळे दाहीया परिवार पूर्णपणे हादरले असून, आता आम्हाला घरात सुद्धा हेल्मेट आणि चिलखत घालून बसावे लागणार कि काय? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत ‘आवर्तन पवई’शी बोलताना श्रीमती दाहीया यांनी सांगितले, “२२ तारखेला स्वयंपाकघरात असताना बाथरूममध्ये काहीतरी फुटल्याचा जोरदार आवाज झाला, म्हणून मी तिथे जावून पाहिले असता खिडकीची काच फुटली असल्याचे दिसले. त्या काळात आमच्या खालच्या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम चालू असल्याने हादरा लागल्याने काच फुटली असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “२४ तारखेला काही काम असल्याने इमारतीचा प्लंबर आमच्याकडे घरी आला होता. त्याने ते पाहताच, हे हादरून नाही तर काहीतरी लागून फुटले असल्याचे सांगितले, कारण सुरक्षा जाळी आणि खिडकीची काच दोन्हीलाही छेद झाल्याचे दिसत होते. आम्ही व्यवस्थित पाहणी केली असता खिडकीच्या स्लाईडिंगमध्ये गोळीचा पुढील भाग आम्हास आढळून आला. याबाबत त्वरित आम्ही सोसायटी ऑफिस आणि पवई पोलिसांना माहिती देवून तक्रार नोंद केली असून काहीतरी ठोस पाऊले उचलली जातील अशी आशा करतो.”

”आम्ही गोळी ताब्यात घेऊन चाचणीसाठी पाठवली आहे. गेली कित्येक महिने एसएलआर प्रशिक्षण हे भटवाडी प्रशिक्षण केंद्रावर बंद आहे. केवळ पिस्तूल प्रशिक्षणच तिथे चालते, त्यामुळे ही गोळी नक्की तिथूनच आली कि आणखी कोठून हे न्यायवैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट होईल, तोपर्यंत आम्ही इतर तपास करत आहोत” असे याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

गोळीच्या प्राथमिक तपासणीनंतर ३ फेब्रुवारीला बैलेस्टिक तज्ञांनी टोरीनो आणि एवलॉन या दोन्ही ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. ‘सुरक्षा रक्षकाच्या मानेत घुसलेली गोळी आणि बाथरूममध्ये आलेली गोळी ही  ९ एमएम बंदुकीतून चालवलेली गोळी आहे. या बंदुकीतून गोळीची आघात करण्याची क्षमता ही केवळ १०० मीटर एवढीच असते, तिथून पुढे तिला दगडाचे रूप प्राप्त होते आणि आघातही कमी होतो. तुमच्या इथे आलेली गोळी ही जवळून चालवली असल्याचे दिसते आहे, कारण तिचा आघात जास्त आहे; परंतु संपूर्ण तपासानंतरच आम्ही काही ते ठोस सांगू शकू,’ असे एवलॉन येथील परिवारासोबत बोलताना बैलेस्टिक तज्ञांनी सांगितले.

भटवाडी प्रशिक्षण केंद्रावर एसएलआरचे प्रशिक्षण बंद असतानाही सतत येणाऱ्या गोळ्या, बैलेस्टिक तज्ञांनी गोळी एवढ्या लांबून गोळी येण्यावर दर्शवलेली शंका, व प्रत्येक वेळेस घाटकोपर प्रशिक्षण केंद्रातून गोळी आली हे सांगून पोलिसांचा तपास बंद, या सगळ्यांना कंटाळून आता स्थानिकांनी पुढेचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांचे प्रतिनिधी येत्या काही दिवसात मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह मंत्रालय यांना भेट देवून प्रशिक्षण केंद्राची दिशा बदल अथवा उंच सुरक्षा भिंत तयार करा अशी मागणी करणार आहेत.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!