आयआयटीचे बस स्टॉप हलवले, पण नक्की कोणासाठी? – संतप्त नागरिक

iit bus stop issueजोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मेनगेट येथील जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप वाहतुकीला अडथळा आणत असल्याने, १ तारखेपासून आयआयटी मेनगेट पादचारी पुलाजवळ हलवण्यात आला आहे. बस स्टॉपला हलवले गेल्याने येथील स्थानिकांना रहदारीतून रस्ता काढत लांब बस स्टॉपवर जावे लागत आहे. यामुळे हा बस स्टॉप नक्की नागरिकांच्या सेवेसाठी हलवला आहे? की व्यावसायिकाला होणाऱ्या अडचणीला दूर करण्यासाठी हटवला आहे? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. या विरोधात काही स्थानिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून, हे बस स्टॉप पुन्हा मूळ जागी किंवा त्याच्या आसपास, वाहतुकीला अडथळा निर्माण करणार नाही अशा ठिकाणी लावण्याची मागणी करणारे पत्र बेस्ट व्यवस्थापक, बेस्ट अधीक्षक आणि स्थानिक बस डेपोला पाठवले आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या निर्मितीमुळे पूर्व आणि पश्चिम धृतगती महामार्ग जोडले गेले आहेत. ज्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते, अशात एक छोटेसे काम जरी या मार्गावर सुरु झाले तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या संपूर्ण रस्त्यांवर अनेक बस स्टॉप हे सर्विस रोडवर आहेत. यातीलच एक आयआयटी मेनगेटवरील बस स्टॉपवर बस उभी राहिल्यास तिच्या पाठीमागे स्थानिक भागात जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागत असत. बस स्टॉपपासून काहीच अंतरावर दोन मंदिरे सुद्धा आहेत, येथे येणारे भाविक जीवावर उदार होऊन या रहदारीतून रस्ता पार करत असतात. जे पाहता येथील काही राजकीय प्रतिनिधी आणि नेत्यांनी हे बस स्टॉप येथून हलवण्याची मागणी केली होती. ज्याच्या परिणाम स्वरूप १ मार्च २०१६ पासून हे बस स्टॉप आयआयटी मेन गेट समोरील पादचारी पुलाच्या खाली हलवण्यात आले आहे.

बस स्टॉप हलवल्यापासून वाहतूक कोंडी मिटली असली तरी मात्र शाळेतील विद्यार्थी, स्थानिक नागरिक, जेष्ठ नागरिक यांना मोठा पल्ला पार करत प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीला तोंड देत जीव मुठीत घेवून बस स्टॉप पर्यंत पोहचावे लागत असल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. हा बस स्टॉप हा नागरिकांच्या सुविधेसाठी नव्हे तर पूर्वीच्या बस स्टॉपच्या पाठीमागील भागात असणाऱ्या हॉटेल व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याने यास हटवण्यात आले असल्याचेही  नागरिकांकडून बोलले जात आहे.

या बाबत फेसबुकच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना स्थानिक नागरिक अमोल चव्हाण म्हणतात, “हॉटेलला पार्किंग मिळावी म्हणून बेस्ट बस स्टॉप हलवणाऱ्या हॉटेल मालकावर कारवाई होणार का? सर्व सामान्यांना त्रास होईल अशी गोष्ट करण्यासाठी त्या हॉटेल मालकाला साथ देतायत त्यावर कारवाई होणार का? आयआयटी मेनगेट येथील अंधेरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप, लक्ष्मी हॉटेलला पार्किंग मिळावी म्हणून हलवण्यासाठी जेवढे पत्र व्यवहार करणाऱ्यात आले त्या महानुभावांना एवढे पण लक्षात नाही आले का? कि लोकांना त्रास होईल. साहेब आपण एसी गाड्यांनी फिरता, आम्ही सर्व सामान्य नागरिक बस ट्रेनने फिरतो. ट्राफिक होईल म्हणून बस स्टॉप हलवता, थोडे पुढे गेले कि याच रोडवर मिनीपंजाब हॉटेलसमोर सुद्धा गाड्या थांबतात तिथे ट्राफिक होत नाही का? हॉटेल समोर ज्या गाड्या उभ्या राहतात त्यामुळे पार्किंग होत नाही का? बेस्ट बसचा त्रास होतो याचा नाही का? हॉटेल मालक निवडणुकीत मतदान करणार आणि आम्ही बसने फिरणारे नाही करणार असे आहे का? असे तर नाही हा हॉटेल मालक निवडणुकीत निधी देणार? असे खूप प्रश्न माझ्यासाख्या सर्व सामान्य माणसाला पडतायत. कदाचित हे खरे हि असेल पण एक लक्षात ठेवा आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून आणि मते देणारी मशीन समजून खेळत असाल तर सावधान. जे तुम्हास पटते ते तुम्ही कराव आम्हास काही देण नाही, पण एक लक्षात असावं, मी जातीने शिवसैनिक आहे, एकदा पाठी लागलो तर पाठ सोडणार नाही, अन्याय तर मुळीच सहन करणार नाही.”

आवर्तन पवईशी बोलताना ते म्हणतात “माझा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा पक्षनेत्याला विरोध नाही आहे, जे काम झाले आहे त्यास माझा विरोध आहे. जे कोणी हे काम केले त्यांनी जनतेला होणाऱ्या त्रासाचा विचार करून हलवणे जरुरी होते. जनतेला त्रास न होणाऱ्या जागी हलवले असते तर जनतेचा विरोध झालाच नसता.”

या बस स्टॉपच्या हलवण्याने काही नागरिकांना सुविधा सुद्धा झालेल्या आहेत. त्यांच्या मते “बस स्टॉपवर उतरल्याने लगेच पादचारी पुलाच्या मार्गाने रस्ता पार करता येतो, शिवाय पादचारी पूल उतरताच बस स्टॉप विना रहदारीचा सामना करता पोहचता येते, तेव्हा हे सुविधाकारकच झाले आहे.”

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!