आयआयटीत पाण्याच्या वापराची चंगळ

आयआयटी विद्यार्थ्यांनी पाहणी व अभ्यास करून ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून वास्तव आणले समोर

संग्रहित छायाचित्र: nearfox

संग्रहित छायाचित्र: nearfox

कीकडे मुंबईकर पाणी टंचाईशी लढत असतानाच, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मुंबईतील पवई कॅम्पसमध्ये मात्र पाण्याची चंगळ चालू असल्याची खळबळजनक माहिती आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पाहणीतून समोर आली आहे. मुंबईकरांना सरासरी २६८ लिटर पाणी दररोज वापरास मिळत असताना, आयआयटीतील प्रत्येक व्यक्तीला मात्र दररोज तब्बल ३५८ लिटरच्या जवळपास पाणी वापराकरिता मिळत आहे. दरडोई वापराकरिता नेमून दिलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा ते कितीतरी अधिक असल्याचे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पाहणी व अभ्यास करून ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून हे वास्तव समोर आणले आहे.

मिहिर कुलकर्णी, वैभव भोसले, अनिश गुप्ता, चैतन्य मंडुगुला, संदीप उपाध्याय, श्रीरंग जावडेकर, शार्थ मदान आणि जीवराम कारवा या विद्यार्थ्यांच्या चमूने ही पाहणी करून अभ्यासाच्या माध्यमातून हे सत्य उघड केले आहे.

महापालिकेतर्फे व २४ बोअरवेलच्या माध्यमातून संपूर्ण संकुलाला पाणीपुरवठा केला जातो. चार आणि सहा लाख लिटर क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या या कॅम्पसमध्ये आहेत. या पाण्याचा वापर प्रामुख्याने बगिचे, झाडे, शौचालये, हायड्रोलिक प्रयोगशाळा यांच्यासाठी केला जातो. मुंबईत अनेक ठिकाणी ठराविक वेळेतच पाणीपुरवठा होत असताना आयआयटीमध्ये मात्र चोविस तास पाणी उपलब्ध असल्याने चंगळच आहे; परंतु पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याची उधळपट्टी करणे योग्य नाही, असे पाहणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते.

पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नेमून दिलेल्या निकषांनुसार घरगुती वापर असल्यास दरडोई १५० लिटर व कार्यालयात दरडोई ४५ लिटर इतके पाणी वापरायला मिळाले पाहिजे. मुंबई शहरात मात्र ते यापेक्षा जास्त आहे. २०१३-१४च्या आराखडय़ानुसार मुंबईत पाण्याचा वापर दरडोई २६८ लिटर इतका आहे, मात्र आयआयटीत तर त्यापेक्षा ही अधिक म्हणजेच तब्बल ३५८ लिटर दरडोई पाणी वापरले जात असल्याचे या विद्यार्थ्यांच्या पाहणीतून समोर आल्याचे त्यांनी ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून मांडले आहे.

निवासी इमारतींमध्ये दरडोई ५१३ लिटर पाण्याचा वापर केला जातो आहे, तर विद्यार्थी वसतिगृहांमध्ये ते प्रमाण दरडोई ३६३ लिटर एवढे आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीत मात्र ते दरडोई ५८ लिटर इतकेच पाणी वापरले जात असल्याचे हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात समोर आले आहे.

पाण्याच्या पुरवठा आणि वापरात चंगळ असली तरी पाण्याच्या वापराबाबत स्वयंशिस्त असावी यासाठी या विद्यार्थ्यांनी पाहणीत काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत.

* पाण्याचा वेग कमी असणारे नळ वापरून पाण्याची बचत करणे.

* सौंदर्यकरणासाठी गवताचे मैदान, कुरणे तयार करण्याऐवजी स्थानिक वृक्ष, रोपटे आणि झुडपांची लागवड करणे.

* रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाण्याचा पुनर्वापर करणे.

* झाडांसाठी वा बगीचांकरिता सांडपाण्यावर प्रक्रिया करून वापरणे.

* संकुलातील वृक्षांचे जतन आणि संवर्धन.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!