खोट्या नावाने नोकरी मिळवून, ४ लाखाची चोरी करणाऱ्या मोलकरणीला पवईमध्ये अटक

सावधान इंडिया मालिकेतून प्रेरित होऊन अनेक महाविद्यालीन मुलींना चित्रपट क्षेत्रात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे तपासात उघड

VKकाम मिळवून देणाऱ्या संस्थेत खोटी कागदपत्रे सादर करून, पवईमधील रहेजा विहार येथे एका व्यावसायिकाच्या घरात २४ तास मोलकरणीचे काम मिळवून, त्यांचा विश्वास संपादन करून ३.५ लाखाचे दागिने आणि ५० हजाराच्या रकमेवर हात साफ करणाऱ्या वैजयंती मोरेश्वर कामत (२१) या मोलकरणीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात टिव्हीवरील सावधान इंडिया मालिकेतून प्रेरित होऊन वैजयंतीने अनेक महाविद्यालयीन मुलींना चित्रपट क्षेत्रात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचेही समोर आले आहे.

रहेजा विहार येथील व्यावसायिक भरत मेहता (बदललेले नाव) यांना २४ तास मोलकरणीची गरज असल्याचे पाहता अंधेरी येथील एका कामगार पुरवणाऱ्या संस्थेने अनिता काळे (वैजयंतीने धारण केलेले खोटे नाव) नामक महिलेला त्यांच्याकडे घरकामासाठी पाठवले. ९ ऑक्टोंबरला मेहतांकडे नोकरीला राहिलेल्या अनिताने मेहता परिवाराचे काही दिवसातच मन जिंकले होते, त्यामुळे तिच्या विश्वासावर ते अनेकदा बाहेर जात असत. याच विश्वासाचा फायदा घेत पुर्वनियोजित कटानुसार डिसेंबरमध्ये अनिताने मेहता यांच्या घरातील ३.३६ लाखाचे दागिने आणि ५० हजार रोख रक्कम घेऊन तेथून पोबारा केला.

याबाबत मेहता परिवाराला माहिती पडताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात अनिता विरोधात चोरीची तक्रार दाखल केली.

“काही वेळातच आमच्या टिमने अंधेरी येथील संस्थेत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर अनिता काळेला चेंबूर येथून शोधून काढले; परंतु मोलकरीण म्हणून काम करणारी अनिता आणि तिथे मिळून आलेली अनिता या दोन्ही वेगळ्या होत्या. खऱ्या अनिता काळेची फसवणूक करून तिच्या कागदपत्राच्या आधारावर दुसऱ्याच महिलेने नोकरी मिळवली होती” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले.

तपासी अधिकारी सपोनि संभाजी मोहिते याबाबत बोलताना म्हणाले, “कोणीतरी तिऱ्हाईत महिला खोट्या नावाने सर्व माहिती आणि खोटे मोबाईल नंबर देवून नोकरी मिळवत असल्याने, तिला शोधून काढणे आमच्यासाठी मोठे आव्हानात्मक होते. मात्र खऱ्या अनिता काळेला भेटल्यानंतर तिला ज्या नावाने फसवले गेले ते नाव आणि कागदपत्रे, पुढे त्या कागद पत्राच्या आधारे दुसरे नाव तेथील कागदपत्रे आणि पुढे अजून काही बळीत यांच्या चौकशीत आमच्या हाती काही धागेदोरे लागले. खोट्या नावाने लोकांना फसवणारी ती महिला धारावी येथील असून, तिचे खरे नाव वैजयंती मोरेश्वर कामत असल्याचे समोर येताच, आम्ही ती राहत असलेल्या परिसरात साध्या वेशात सापळा रचून तिला अटक केली. तिच्या घरातून आम्हाला ३.३६ लाखाचे दागिने आणि १६ हजार रोख रक्कम हस्तगत झाली आहे. इतर रक्कम तिने खर्च केली आहे.”

गुन्ह्याची पद्दत

आमच्या तपासात ‘वैजयंती बस स्थानके, लोकल ट्रेन, ब्युटी पार्लर, महाविद्यालयातील ठिकाणे अशा ठिकाणी गरीब, साध्या, कोणत्याही भूलथापांना बळी पडतील अशा महिला व  मुलींना ती हेरत असे. त्यांना चित्रपट सृष्टीत शुटींगच्या वेळेस कलाकारांचे कपडे आणणे व घेऊन जाण्याचे काम, चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून, त्यांच्याशी मैत्री करून कागदपत्रे मिळवीत असे. ज्या दिवशी त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू असत, तेव्हा जवळपासच्या स्टेशन जवळील परिसरात त्यांना घेऊन जावून, ‘मौल्यवान वस्तू माझ्याजवळ दे, स्टेशनवर माझी मैत्रीण आली आहे, तिला घेऊन ये’ म्हणून सांगत असे. ती महिला किंवा मुलगी तिकडे जाताच वैजयंती सर्व मौल्यवान वस्तू घेऊन तिथून पळ काढे. अशा प्रकारे तिने अनेक महाविद्यालयीन मुलींना आपले शिकार बनवलेले आहे. यातीलच सर्वात शेवटची पिडीत अनिता काळे हिच्या कागदपत्रांच्या साहय्याने तिने रहेजा विहारमध्ये घरकाम करण्याचे काम मिळवले होते” असे मोहिते यांनी सांगितले.

अपराध साखळी

पोलीस तपासात दिवा येथील ऋतुजा राणे, प्रतीक्षानगर येथील पूजा कदम, बेलापूर येथील जयश्री देवरुखकर आणि गोवंडी येथील अनिता काळे यांची याच गुन्ह्याच्या पद्दतीने फसवणूक केली असल्याचे तिने कबूल केले. याबाबत दिवा आणि प्रतीक्षानगर वगळता सर्व ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. टिव्हीवरील सावधान इंडिया मालिकेतून तिला गुन्ह्याच्या पध्दतीची कल्पना मिळाली असल्याचे तिने यावेळी कबूल केले आहे.

पोलीस उपायुक्त समद शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर, पोलीस निरीक्षक भरत जाधव (गुन्हे प्रकटीकरण – पवई पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोहिते सह पोलीस हवालदार व्हावाळ, ढोले व दळवी यांनी गुन्ह्याची उकल केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!