चांदिवलीत इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, दोन जखमी, बचावकार्य सुरु

चांदिवली, संघर्षनगर बस स्टॉपजवळील कृष्णा बिसनेस पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना इमारतीचा वरील माळ्यांचा काही भाग कोसळल्याची घटना आज (शनिवारी) संध्याकाळी घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली अजून ४ ते ५ लोक अडकल्याची शक्यता असून, अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे.

चांदिवलीत गेल्या काही महिन्यांपासून कृष्णा बिसनेस पार्क इमारतीला पडण्याचे काम सुरु आहे. उरलेल्या सात मजली इमारतीचे पडण्याचे कार्य सुरु असतानाच आज (शनिवारी) संध्याकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या वरच्या चार मजल्यांचा मधला भाग अचानक कोसळला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर २ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

“ढिगाऱ्याखाली अडकून पडलेले, जखमी आणि मृत अशा सर्व व्यक्ती या इमारतीला पडण्यासाठी काम करणारे कामगार आहेत. ढिगाऱ्याखाली अजून किती लोक अडकून पडले आहेत हे सांगणे कठीण आहे, मात्र चार ते पाच लोक अडकून पडले असण्याची शक्यता आहे.” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गौरव (३२) याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यु झाला असून, बबलू (२५), पवन (१९) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. “इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकून पडलेले सर्व हे येथे काम करणारे कामगार आहेत. अडकलेल्या व्यक्तींमध्ये दोन क्रेन चालक, ४ सळई तोंडणार कामगारांचा समावेश आहे. २ जेसिबी मशीन्स सुद्धा ढिगाऱ्याखाली अडकल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

“इमारतीचा मधला भागच पडला असून, बाजूचा भाग अजूनही अधांतरीच आहे. त्याची पडण्याची शक्यता असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.” असे यावेळी बोलताना मुख्य अग्निशमन अधिकारी रहंगदाळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!