डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त पवईत विविध कार्यक्रमांचे आयोजन

रविराज शिंदे, अविनाश हजारे, सुषमा चव्हाण

asdभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी दिवसभर पवईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण दिवस हा विविध माध्यमातून ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

‘धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन’ तर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, १२५ बाईकवरून ही रॅली संपूर्ण पवईभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विविध मार्गातून ते जनतेमध्ये रुजवणार आहेत. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ तर्फे अवयवदान व दुष्काळग्रस्तांना पाण्याचे टँकर्स पाठवले जाणार आहेत, तर फुलेनगरमधील ‘भिमजल्लोष’ तर्फे संविधान गौरव रॅलीचे भव्य आयोजन केले आहे. फुलेनगर येथीलच भीम उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक निघणार असून, भीमसैनिक विद्यानंद काकडे यांच्या वतीने मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तर ‘मनसे’ तर्फे आयआयटी मेनगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती चांदिवली तालुका तर्फे भव्य रॅलीचे आयोजन, अशी संपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त पवईत पहावयास मिळणार आहे.

धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे बाईक रॅली : या संस्थेतर्फे १२५ बाईकवर स्त्री-पुरुष एकत्रित रित्या आंबेडकरी विचारांना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी रॅली काढणार आहेत. फुलेनगर, चंदननगर, हरीओम नगर, रमाबाई आंबेडकर नगर मार्गे जयभीम नगर बुद्धविहार येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या प्रवासा दरम्यान रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये स्थानिक जनतेला बाबासाहेबांचे विचार आणि मार्गदर्शन करण्याबरोबरच छोट्या छोट्या पथनाट्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अवयव दान व दुष्काळग्रस्तांना मदत: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वार्ड क्रमांक ११५ तर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत सामाजिक बांधीलकीची जाण ठेवत परिसरामध्ये ‘अवयवदान’ व दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टँकर्स पाठवले जाणार आहेत.

भिमजल्लोषतर्फे संविधान गौरव रॅली: महात्मा फुलेनगरमध्ये फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या सर्व गटतटानी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या ‘भिमजल्लोष’च्या संकल्पनेतून सकाळी ९ वाजता ध्वजारोहण  आणि धम्मवंदना करून दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, संध्याकाळी ५:०० वाजता भव्य ‘संविधान गौरव रॅली’चे आयोजन केले असून, त्या माध्यमातून संविधानाप्रती नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

याच कार्यक्रमाचा पुढील भाग म्हणून १५ एप्रिलला बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, तर १६ एप्रिलला पंचशील बुद्धविहारासमोर “ स्वर मल्हार” ऑर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. १६ व १७ एप्रिल रोजी भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या असून विजेत्या संघांना अनुक्रमे पंचवीस हजार पंधरा हजार रुपये व पारितोषिके देण्यात येणार आहेत.

भीम उत्सव समितीची भव्य मिरवणूक: फुलेनगर येथील भीम उत्सव समितीतर्फे संपूर्ण पवई परिसरात भव्य मिरवणूक निघणार असून, हजारोच्या संख्येने स्थानिक व पवईकर यात सहभागी होणार आहेत.

या सोबतच विविध ठिकाणी दिवसभर भीमगीते, संस्कार प्रबोधन, बाबासाहेबांचे विचार, परिसंवाद, कव्वाली असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!