नशाखोरी रोखण्यासाठी पवईकर एकवटले

वई भागात वाढत्या नशाखोरीला आळा घालता यावा आणि या समस्येला परिसरातून पूर्ण नष्ट करता यावे म्हणून पवईकर एकत्रित आले आहेत. बुधवारी, ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येवून, पवई पोलिसांसोबत चैतन्यनगर येथे याबाबत एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. तर पोलिसांनी यावर उपाययोजना सुचवत नागरिकांनी पुढाकार घेत पोलीस – जनता समन्वयाच्या माध्यमातून या समस्येला मिटवण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पवईकरांसोबतच पवई पोलीस ठाण्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयआयटी चैतन्यनगर येथे नशेत असणाऱ्या टोळीने ५ तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली. नशेखोरांनी परिसरात मांडलेल्या उच्छादामुळे आधीच त्रस्त असणारे पवईकर या घटनेमुळे पुरतेच हादरले असून, नागरिक संध्याकाळच्या वेळेस घरातून बाहेर पडण्यासही घाबरत आहेत.

या घटनेचे तीव्र पडसाद पवईत उमटू लागले असून, या समस्येवर त्वरित निर्बंध घातला नाही तर जनतेमध्ये उद्रेक होऊन मोठी घटना घडण्याचे संकेत जाणवत आहेत. म्हणूनच पवई पोलीस, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष (ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले राजकारण बाजूला ठेवत पुढाकार घेवून) यांनी जनतेच्या समस्या आणि उपाययोजना सुचवण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते.

यावेळी समाजाच्या अनेक स्तरातील नागरिकांनी पवई भागात वाढत्या नशेखोरी बाबतचे प्रश्न मांडताना येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून होणाऱ्या चोरी, लुटमार, छेडछाड सारख्या घटना. येथील अनेक खेळाची मैदाने आणि उद्यानांवर कब्जा करत त्यांचे नशेखोरीच्या अड्ड्यात झालेले रुपांतर. वाढत्या मारामारीच्या घटना, पोलिसांची अत्यल्प गस्त अशा बऱ्याच समस्या यावेळी पोलिसांसमोर मांडल्या.

यावेळी पोलिसांतर्फे जनतेला मार्गदर्शन आणि गुन्हेगारी रोखण्याचा विश्वास देताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर म्हणाले “गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखायचे असेल तर जनता आणि पोलीस यांनी एकत्रित काम करणे खूप महत्वाचे असते. हा तुमचा परिसर आहे, येथे येणारा प्रत्येक अधिकारी हा केवळ काही दिवसांसाठी आलेला असतो, तो जातो दुसरा येतो मात्र जनता तीच असते. आधिकारी लाचखोर किंवा टाळाटाळ करत असला तरी जनतेने मनात आणले तर ते त्याच्याकडून नक्की काम करून घेवू शकतील. जनता ही वर्दी नसलेली पोलिसच असते. तुम्ही गुन्हेगारांना अटक करू शकत नसला तरी त्यांना पकडून नक्की देवू शकता. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर काम करणाऱ्या पोलिसांना जनतेची साथ मिळाली तर गुन्हेगारी रोखता येईल.”

पोलिसां पुढील आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले, “नशाखोरी करणाऱ्या व्यक्तींना पकडणे आणि त्यांना सांभाळणे पोलिसांसाठी एक दिव्यच असते. गुन्हेगार पकडला गेला की लगेच तेथील नेता, पुढारी यांचे फोन येतात ‘आमचा माणूस चांगला आहे त्याला त्वरित सोडा’ पोलिसांवर दबाव बनवला जातो, मग ते कार्य कसे करणार? गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्य करा, गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासाठी नाही. नशेत असलेल्या लोकांना पकडल्यावर त्यांना एक चार्ज मारून सोडले जाते, मात्र त्यांचे नातेवाईक त्यांचा ताबा घेण्यासाठी समोर येत नाहीत. अशा नशेत बेधुंद लोकांना रात्रभर कोणतीही इजा होऊ नये, तो व्यवस्थित रहावा म्हणून मग आम्हालाच काळजी घ्यावी लागते. नाहीतर कोठडीत घडलेल्या घटनेसाठी फुकटचा ससेमिरा पोलिसांच्या मागे लागतो.”

“जनतेने उत्सवांच्या काळात स्वतः जरा जागरूक राहणे आवश्यक आहे. आपला मुलगा, पती काय करतो आहे? तो कोणाच्या संगतीत आहे? याकडे घरच्या लोकांनी लक्ष दिले पाहिजे. स्थानिकांच्या नियंत्रणातून उत्सवात होणारे गोंधळ कसे रोखू शकतो याबाबत उपाययोजना कराव्यात. मुळात प्रत्येक नागरिकाने कायद्याचा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टीसाठी कोणाला तक्रार करावी हे माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट रोखणे पोलिसाचेच काम नाही; परंतु कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस कारवाई करतात. संबंधित विभागाला तक्रार दिली तर पोलिसांवरील ताण कमी होऊन ते गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक सक्षम रितीने काम करू शकतील” असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालिका निवडणुका तोंडावर असताना पवईला खऱ्या अर्थाने भेडसावणाऱ्या या मोठ्या समस्येसाठी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था एकत्रित आल्या आहेत. प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेत आम्ही सर्व पोलिसांसोबत आहोत असा विश्वास दिल्याने नशाखोरी रोखण्यसाठी खऱ्या अर्थाने पवई एकवटली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , ,

One Response to नशाखोरी रोखण्यासाठी पवईकर एकवटले

  1. Sandesh Chouhan May 21, 2017 at 9:26 pm #

    पवई पुलीष नाकाम आज भी गरदुल्ले मौजसे घुमरहे है ईस कान्ड के २अपराधी सिर्फ अटक हूएे है बाकी सब मौज से पवई मे घुम रहे है खुले आम मेरी वरिष्ठ पोलीष से विनंन्ती है की ईन सबको अटक करे वरना फिर कोई मुसीबत बडा खड़ा हो सकता है

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!