पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला, पॅराशूट नसून निघाले फुगे

air baloonविमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी पोलीस तपासात ते पॅराशूट नसून एअर बलून होते हे स्पष्ट होताच पवईकरांचा जीव भांड्यात पडला.

शनिवारी संध्याकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ पॅराशूट सदृश्य पाच वस्तू हवेत उडत असल्याचे, उड्डाण करण्यास तयार असणाऱ्या एका विमानाच्या वैमानिकाला दिसल्या होत्या. याबाबतची माहिती त्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिल्यावर काही वेळेपुरते विमानतळावरील विमानांचे टेक-ऑफ व लँडिंग थांबवण्यात आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती व थेट पंतप्रधान कार्यालयानेच या संदर्भात अहवाल मागवला होता.

या संदर्भात तपास करणाऱ्या यंत्रणांना या पॅराशूट सदृश्य पाच वस्तू पवईच्या दिशेने आल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे सोमवारी दिवसभर पवईच्या विविध भागांमध्ये तपास यंत्रणा याचा शोध घेत होत्या. विमानतळावर दिसलेल्या पॅराशूट सदृश्य वस्तू या घातपाताच्या हेतूने वापरल्या असाव्यात आणि ते आपल्या भागात उतरले असल्याची बातमी पवई भागात वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात भर म्हणून कि काय, तपास यंत्रणांनी सोमवारी परिसरात राबवलेल्या शोध मोहिमीमुळे तर लोकांचा विश्वासच झाला कि परिसरात एक मोठे संकट वावरत आहे. पण शेवटी ‘खोदा पहाड और निकला चुहा’ असेच काहीसे या प्रकरणात घडले आहे. ते पॅराशूट नसून एअर बलून होते असे पोलिस तपासात समोर आले आहे. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटना दरम्यान हे एअर बलून सोडण्यात आले होते अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे.

एअर इंडिया मैदानावर एका डायमंड कंपनीतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटना दरम्यान आयोजकांनी हवेत एअर बलून सोडले होते. विना परवानगी एअर बलून सोडल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आयोजकांना अटक केली. या दोघांना अंधेरी कोर्टासमोर हजर केले असता, दहा हजार रुपयाच्या जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

तपास यंत्रणाच्या हाती लागलेल्या डेविड हेडलीने त्याने मुंबईच्या विविध भागात केलेल्या रेखी मध्ये पवईचा सुद्धा समावेश असल्याचे सांगितले होते. या भागात जलवायू विहार, परदेशी नागरिक मोठया प्रमाणावर असतात असे पंचतारांकित हॉटेल्स, आयआयटी, तसेच सुरक्षा यंत्रणेचे मोठे बस्तान सुद्धा आहे, त्यामुळे हा परिसर आतंकवाद्यांच्या हिटलीस्ट वर आहे. काही काळ या भागातील सर्व अति महत्त्वाच्या भागांना पोलिसांचे सुरक्षा कवच निर्माण करण्यात आले होते, परंतु आता ते कवच हटवण्यात आले आहे.

विमानतळ भागात दिसलेले ते पॅराशूट पवईच्या दिशेने आले असल्याचे वृत्त जवळ जवळ सगळ्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी दिले होते. त्यात भर म्हणून सोमवारी दिवसभर विविध तपासयंत्रणांची पवईत पॅराशूटची शोध मोहीम चालू होती. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि पवईकरांचा ठाम विश्वास झाला कि परिसरात मोठे संकट वावरत आहे. प्रत्येकजण मुंबई हल्ल्यासारखे दुसरे प्रकरण समोर येऊ नये म्हणजे झाले म्हणून प्रार्थना करत होता. परंतु तपास यंत्रणांनी आकाश-पाताळ एक करून शेवटी या प्रकरणाचा छडा लावला आणि त्या पॅराशूट सदृश्य वस्तू पॅराशूट नसून एअर बलून होते हे स्पष्ट होताच पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला आणि प्रत्येक पवईकरांच्या ओठी एकच शब्द होते खोदा पहाड और निकला चुहा’.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!