पवईकरास पाकमध्ये हेरगिरीच्या संशयावरुन अटक

Kulbhushanहिरानंदानी, पवई येथील रहिवाशी व व्यावसायिक असणारे कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या संशयात शुक्रवारी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चमन येथून अटक केली आहे. ते भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे अधिकारी असून, ते हेरगिरीसह बलुचिस्तानात फुटीरतावाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने त्यांच्यावर ठेवला आहे. भारताच्यावतीने याबाबत स्पष्टीकरण देताना ‘ते नौदलाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांचा भारत सरकारशी सध्या कोणताही संबंध नाही’, असा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. पाकिस्तानकडून सल्लागार प्रवेश मिळत नसल्याने पाकिस्तान याबाबतीत काय पुरावे सादर करणार यावर पुढील खुलासे होतील.

मात्र जाधव हे पवईतील रहिवाशी असल्याची माहिती समोर येताच, माध्यमाच्या प्रतिनिधींनी हिरानंदानी येथील त्यांच्या घरासमोर गर्दी करून त्यांचे शेजारी, सुरक्षारक्षक यांना नको नको त्या प्रश्नांचा भडीमार केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रहिवाश्यांच्या व्यतिरिक्त इतरांना आता इमारतीत प्रवेश नाकारला जात असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे.

इस्लामाबाद येथील पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझिज अहमद चौधरी यांनी भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावडे यांना या संदर्भातील माहिती दिली. यानंतर भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी जाधव हे नौदलातील निवृत्त अधिकारी असून, त्यांचा सध्या भारत सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

“जाधव हे माजी मुंबई पोलिस उपआयुक्तांचे चिरंजीव आहेत. पवईतील हिरानंदानी येथे असणारे घर हे त्यांच्या वडिलांच्या नावे असून, जाधव आपल्या परिवारासोबत गेल्या अनेक वर्षापासून येथेच राहतात. कामानिमित्त ते नेहमीच परदेश दौरे करत असतात.” असे आवर्तन पवईशी बोलताना स्थानिकांनी सांगितले.

काही स्थानिकांनी मात्र या प्रकरणात माध्यमांकडून त्यांना नाहक त्रास दिला जात असून, त्यामुळे ते त्रस्त झाले असल्याबाबत राग व्यक्त केला आहे. एक भारतीय नागरिकांची मदत करण्याऐवजी माध्यमे त्यांची समस्या वाढवण्यात गुंतलेले आहेत, असा संतापही रहिवाश्यांनी यावेळी व्यक्त केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जाधव यांच्या परिवाराला येथून हलवण्यात आले आहे, तर संपूर्ण इमारत आणि परिसरात सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.

“हा संपूर्ण पाकिस्तानचा खोटा बनाव आहे. एक सामान्य व्यावसायिक कामानिमित्त दौऱ्यावर असताना, त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. पाकिस्तानाने भारतात घडवून आणलेले हल्ले आणि त्याबाबत चाललेला तपास दडपून, भारताचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. भारताने स्पष्टता होण्यासाठी सल्लागार प्रवेशाची मागणी केली होती, परंतु पाकिस्तानकडून त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही आहे. पाकिस्तानकडे भारताने पुराव्यांची मागणी केली आहे, मात्र पाकिस्तान खोटी कागदपत्रे, पासपोर्ट, ओळखपत्र बनवण्यात अग्रस्थानी आहे, त्यामुळे त्यांच्या पुढील कृत्यावरच सर्व काही स्पष्ट होईल.” असे याबाबत बोलताना निवृत्त शसस्त्र सेनादलाच्या अधिकाऱ्याने आवर्तन पवईला सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!