पवईत खंडणीच्या गुन्ह्यात महिला पोलीस अधिकारी व दोन शिपायांना अटक

अटक टाळण्यासाठी महिला पोलीस निरीक्षकाचा पवई पोलिसांना ८ तास गुंगारा, खंडणीसाठी २४ तासात केलेल्या ८ कॉलच्या संभाषणाच्या आधारावर पोलिसांनी केली अटक

IMG_20160402_194008

गुन्ह्यात वापरलेली कार

चांदिवली येथील ओसिएन स्पा आणि सलूनमध्ये देह्व्यवसाय चालतो असा खोटा आरोप लावून, धमकी देवून कारवाई टाळण्यासाठी स्पाच्या मालकिणीकडून २ लाख रुपयाची मागणी करून, १० हजार रुपयाची खंडणी उकळणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस निरीक्षकासह २ पोलीस शिपाई, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा (खबरी) व पोलीस असल्याचा दावा करणारी महिला (खबरी) अशा ५ जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे.

महिला पोलीस निरीक्षक नागीण काळे (४८), पोलीस शिपाई प्रशांत कुलकर्णी (२९), पोलीस शिपाई सागर बुगडे (२९), अविनाश आव्हाड (२८) (खबरी व माजी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा), राजश्री चाळके (२८) अशा ५ जणांना पवई पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.

याबाबत पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक काळे हिने आपल्या दोन शिपायांसह खबरी चाळके हिला महिला पोलीस शिपाई बनवून, अजून एक खबऱ्यासह बुधवारी चांदिवली येथील ओसिअन स्पा मध्ये संध्याकाळी खोटी धाड टाकली. त्यावेळी तेथे उपस्थित सर्वांना एका बाजूस उभे राहण्यास सांगून, तुमच्या स्पामध्ये देह्व्यवसाय चालतो आणि आम्ही छापा मारला आहे व त्वरित स्पाच्या मालकास बोलवून घेण्यास सांगितले.”

काही वेळात तरन्नूम खान या स्पाच्या मालकिणीने तिथे येऊन ते कायदेशीररित्या व्यवसाय करत असल्याचे पुरावे सादर केले. मात्र काळे यांनी तुझ्याकडे स्पा चालवण्याचे परवाने नाही आहेत, शिवाय तुझ्या स्पामध्ये देह्व्यवसाय चालतो, असे तीन तास धमकावत खानला त्यांनी आणलेल्या गाडीत जबरदस्ती बसवले.

“पवई तलाव भागात गाडी आल्यावर काळेने माझ्याकडे कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर, माझ्याकडील दहा हजार रुपये व दोन मोबाईल हिसकावून घेवून, पुढील २४ तासात २ लाख रुपये दे, नाहीतर कारवाईस सामोरे जा, अशी धमकी देवून संध्याकाळी ७.३० वाजता मला पवई तलावाजवळ सोडून ते निघून गेले” असे खान हिने पोलीस जवाबात म्हटले आहे.

“३० मार्च ते ३१ मार्च या काळात काळे, तिचा साथीदार पोलीस शिपाई व खबरी अशा तिघांनी मिळून खान हिला खंडणीच्या मागणीसाठी ८ कॉल केले होते, जे खान हिने रेकॉर्ड करून आमच्याकडे पुरावा म्हणून सादर केले होते. त्यातील पुराव्याच्या आधारावर शुक्रवारी आम्ही प्रथम पोलीस शिपाई आणि खबरी यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या कबुली जवाबानंतर आम्ही काळे हिला अटक केली आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले “अटक होण्यापूर्वी काळे हिने पोलिसांना जवळपास ८ तास गुंगारा दिला होता. तिने आजारपणाचे खोटे नाटक करून सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही तिथे येत आहोत याची माहिती मिळताच ती दुसऱ्या रुग्णालयात निघून जात असे, ४ रुग्णालय बदलल्यावर अखेर शनिवारी सायन रुग्णालय भागातून तिला ८ तासाच्या शोध धावपळीनंतर पकडण्यात आम्हाला यश आले.”

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची कार क्रमांक एमएच ०३ एएम ४१२७, खान हिचा हिसकावून घेतलेला मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे.

भादवी १७० (लोक सेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे), ३४२ (गैर उद्देशाने कैदेत ठेवणे), ३९५ (दरोडा), ४५२ (पूर्व तयारी करून गृह अतिक्रमण) नुसार गुन्हा नोंद करत, पवई पोलिसांनी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

“अटक करण्यात आलेल्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे” असे माध्यमांशी बोलताना धनंजय कमलाकर सहआयुक्त (आर्थिक गुन्हे) यांनी सांगितले. ‘पोलीस खात्यात अटक आरोपींची प्रतिमा ही मलीन असल्याने त्यांना नेहमीच निष्क्रिय जागेवर नियुक्त केले जात असे. आर्थिक गुन्हे शाखेतही त्यांची अशाच जागी नियुक्ती होती. स्पा आणि पार्लरवर धाड टाकणे, कारवाई करणे आर्थिक गुन्हे शाखेचे काम नाही आहे तरी त्यांनी ते केले’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!