पवईत शिवसेनेचा विकास कामांचा सपाटा

shivsenaस्थानिक नगरसेवकांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं असतानाच उद्यानांची डागडुजी, घर घर शौचालय अंतर्गत मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम, गर्दुले – नशेखोरांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, शाळेच्या बसची वाट पाहत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावत शिवसेनेच्यावतीने पवईत कामाचा सपाटा लावला आहे.

मुंबईच्या शिरपेचाचा तुरा असणाऱ्या पवईला गेल्या काही वर्षात अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. धनदांडग्यांच्या वस्तीत समस्या उद्भवण्यापूर्वीच कामे पूर्ण होणाऱ्या पवईत सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या, विविध मंजुऱ्या, फंडांची कमतरता आणि प्रतिनिधींचे दुर्लक्ष यात अडकून पडलेले पहायला मिळत आहेत. या समस्येंची जाण असणाऱ्या शिवसेनेने यातील अनेक समस्यांच्या निवारणाच्या मंजुऱ्या मिळवत पवईत विकास कामांना सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या या कामांची सर्व पक्षांकडून स्तुती होत असून, शिवसेनेचे पारडे येत्या २०१७ च्या निवडणुकीत जड होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पवईतील जुना वार्ड क्रमांक ११५ आणि नवीन प्रभाग रचनेनुसार वार्ड क्रमांक १२२ मध्ये शिवसेनेतर्फे आमदार, पालिका अशा विविध फंडातून चैतन्यनगर येथील दुर्गादेवी शर्मा उद्यान पुनर्जीवित करण्याचे काम, गणेशनगर येथील परिसरात ‘घर घर शौचालय’ अंतर्गत मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम, आयआयटी भागात गर्दुले – नशेखोरांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने सुरक्षा उपाययोजना आणि भर ऊन पावसात शाळेच्या बसची वाट पाहत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी बस थांब्यांच्या ठिकाणी छत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या बाबत बोलताना शिवसेना शाखा ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले, “सत्तेवर असणारे फक्त सत्ता उपभोगण्यात व्यस्त असून, यातील अनेक प्रश्न आणि त्यांच्या फायली गेल्या अनेक वर्षापासून धूळ खात पडल्या आहेत. याबाबत आम्हाला स्थानिकांच्या मिळालेल्या तक्रारी पाहता आम्ही या समस्यांचा पाठपुरावा करत केवळ मंजुऱ्या मिळवून थांबलो नसून, आमदार आणि पालिकासह संबंधित विभागांचे फंड मंजूर करून घेत विकास कामांना सुरुवात केली आहे.”

ते पुढे म्हणाले, “पुढील आठवड्यात उद्यानाच्या कामाची सुरुवात होणार आहे. गणेशनगर येथे मलनिसारण वाहिनीला मंजुरी मिळाली असून, ‘घर घर शौचालय’ अंतर्गत प्रत्येकाच्या घरापासून मुख्य वाहिनी जोडण्याचे काम या अंतर्गत करण्यात येणार आहे.”

शालेय बससाठी वाट पाहत उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या छतांमुळे महिलांमध्ये याचा खूप मोठा आनंद आहे. या बाबत सांगताना शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुख सुरेखा चव्हाण म्हणतात, “मुलांना शाळेत सोडणे आणि घेऊन येण्याची जबाबदारी महिलांवर (आईवर) असते, मुलांसोबत त्यांना सुद्द्धा उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागते. आपला मुलगा सावलीत आहे याच्यापेक्षा मोठे सुख आई व्यतिरिक्त आणखी कोणाला मिळू शकते.”

स्थानिक आमदार सुनील राऊत स्वतः पवईतील स्थानिक भागांना भेट देवून लोकांच्या समस्या जाणून घेत असताना दिसत आहेत. पवई भागात गर्दुले – नशेखोरांनी मांडलेला उच्छाद पाहता सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी त्यांनी स्थानिक प्रतिनिधींसोबत पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांची शुक्रवारी भेट घेतली.

शिवसेनेच्या या कार्याचे सर्व पक्षांकडून स्तुती होत असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कैलाश कुशेर यांनी शिवसेनेच्या शालेय मुलांसाठी छत योजनेची स्तुती करताना त्यांचे अभिनंदन केले आहे. तर, युथ पॉवर संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सुद्धा शिवसेनेकडून हाती घेतलेल्या कामांची स्तुती करताना केवळ एक छत उभे करून किंवा एक ठिकाणी ओपन जिम उभी करून न थांबता लोकांच्या मागणी पाहता सर्व ठिकाणी याची सोय करावी आणि जनतेला दिलेल्या वेळेतच काम सुरु करून वेळेत पूर्ण करावीत अशी मागणी केली आहे.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!