सुरक्षाभिंत, झाडे पडून पवईत गाड्यांचे नुकसान

घराला असणारी सुरक्षा भिंत पडून त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या तीन गाड्यांचे नुकसान झाल्याची घटना बुधवार, ०३ जून रोजी पवईत घडली. तिरंदाज गावठाण येथील एका घराच्या सुरक्षा भिंतीला लागून असणारे झाड कलंडल्याने ही घटना घडली आहे. तसेच हनुमान रोड आणि आयआयटी भाजी मार्केट येथे सुद्धा झाडे पडली आहेत.

निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला मुंबईत धडकणार आहे. यावेळी मुंबईत जोरदार पाऊस आणि वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम पहाटे पासूनच मुंबईत जाणवू लागला असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे आणि भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पवईत सुद्धा अशी एक घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पवईतील तिरंदाज गावठाण येथील दांडगे निवासच्या सुरक्षाभिंती जवळ असणारे एक झाड सकाळी उन्मळून समोरील घरावर कलंडले. हे झाड उन्मळल्याने येथील जमीन उखडत सुरक्षाभिंतीला याची झळ पोहचल्याने ती सुद्धा पडली आहे.

“सुरक्षा भिंत पडल्याने भिंतीला लागून उभ्या असणाऱ्या ३ गाड्या याच्या कचाट्यात आल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घरावर हे झाड आधाराला ठेकल्याने त्याचेही नुकसान झाले आहे,” असे स्थानिक नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले.

“याबाबत पालिका आणि प्रशासनाला कळवले आहे. लवकरच झाड हटवण्याचे काम सुरु होईल, असे स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले.

आयआयटी मार्केट भागात पडलेले झाड

हनुमान रोडवर पडलेल्या झाडाचा भाग

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!