पवईत सोन्याच्या दुकानात कामगाराची ३५ लाखाची चोरी, राजस्थानमधून अटक

सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने रोकड आणि सोने मिळून जवळपास ३५ लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना पवईतील हिरानंदानीत घडली. या संदर्भात पवई पोलिसांच्या विशेष पथकाने एक वर्षांपासून लपाछपी खेळणाऱ्या रामजास जाट (२९) याला अटक केली आहे. जाट याने रोख रक्कम खर्च केली असून, सोन्याच्या वस्तू त्याच्याकडून हस्तगत झाल्या नाहीत.

२९ वर्षीय आरोपी जाट हा पवईतील एक नामवंत सोन्याच्या व्यावसायिकाचे हिरानंदानी आणि चांदिवली नहार येथे असणाऱ्या सोन्याच्या दुकानांचे अकाउंट  सांभाळत होता. पाठीमागील १० वर्षांपासून तो दुकानात काम करत असल्याने त्याला स्टोअरमधील रोख रक्कम आणि डिस्प्लेसाठी असणाऱ्या सोन्यापर्यंत जाण्यास पूर्ण सूट होती. ज्याचा फायदा घेत त्याने स्टोअरच्या खात्यातून १३ लाख रूपये वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केले होते. सोबतच त्याने १९ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या (जवळपास ६०० ग्राम) सोन्याच्या वस्तू लांबवल्या, असे पोलिस अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

‘दुकान मालकाला जेव्हा सोने आणि पैसे गहाळ असल्याचे माहित पडले तेव्हा त्यांनी पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

तक्रारीची माहिती मिळताच जाट मुंबईतून आपल्या मूळ गावी पळून गेला, जिथे त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र न्यायालयाने तो नाकारला.

‘आम्ही राजस्थान येथील त्याच्या गावात जाऊन त्याला अटक केली. त्याने सर्व पैसे खर्च केले आहेत, त्याच्याकडून चोरीस गेलेले सोने अजून मिळून आलेले नाही. याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत’ असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ यांनी सांगितले.

भादंवि कलम ४०८, ४२० नुसार गुन्हा नोंद करून, जाटला न्यायालयात हजर केले असता मॅजिस्ट्रेट कोर्टाने १२ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!