पवई तलावात मगरीचा हल्ला, मच्छिमार गंभीर जखमी

पवई तलावातील खडकावर येऊन बसलेली मगर (संग्रहित छायाचित्र)

वई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आयआयटी तिरंदाज व्हिलेजमध्ये राहणारे मच्छिमार बाबू भुरे (५०) यांच्यावर पद्मावती मंदिराजवळ मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच परिवारातील विजय भुरे याच्यावर ऑगस्ट २०१० मध्ये हल्ला करून मगरीने जीव घेतला होता.

पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे साम्राज्य आहे. तशा सूचना देणारे फलकही पवई तलावातील काही भागात लावण्यात आलेले आहेत, मात्र वर्षानुवर्षे मच्छिमार करून पोट भरणाऱ्या पवई भागात राहणाऱ्या लोकांना दुसरा पर्याय नसल्याने, ते जीवावर उदार होऊन मात्र काळजी घेत आपली मच्छिमारी करत असतात. आयआयटी येथील तिरंदाज गावठाण भागात असे अनेक परिवार आहेत, जे वर्षानुवर्षे याच व्यवसायाच्या आधारे आपला संसाराचा गाडा हाकत आहेत.

बाबू भुरेही गेली ४० वर्षे आपल्या या पारिवारिक व्यवसायानुसार मच्छिमारी करत आहेत. गुरुवारी सकाळी ते मच्छीमारीसाठी जाळे टाकण्यास आयआयटीमधील पद्मावती मंदिर येथून तलावात उतरलेले होते. जाळे टाकून परतत असताना गाळात लपून बसलेल्या मगरीने अचानक त्यांचा पाय धरून पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी खडकाचा आधार घेतला असल्याने मगरीला ते शक्य होत नव्हते. त्यांनी आरडाओरडा करताच इतर मच्छिमारांनी येऊन मगरीला पळवून लावले. तो पर्यंत मगरीने भुरे यांच्या उजव्या पायाचा पंजा तर डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली चावा घेवून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते.

स्थानिक व मच्छिमार परिवार मात्र याबाबत प्रशासनाला दोष देत असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळेच मगरी पिसाळल्या आहेत आणि त्या माणसांवर हल्ले करत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत बोलताना काही महिलांनी आवर्तन पवईला सांगितले, “पूर्वी आम्ही मगरीच्या बाजूने गेलो तरी मगरी कधीच आमच्यावर हल्ले करत नव्हत्या. गेल्या काही वर्षात पवई तलावात चालू असलेल्या कामामुळे त्यांची घरे मोडली गेली आहेत. त्यामुळे त्या दलदल, झाडी जिथे जागा मिळेल तिथे बसून राहतात. काम चालू असताना होणाऱ्या आवाजामुळे सुद्धा त्या घाबरून जावून लोकांवर हल्ले करत आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून हौशे, नवशे मच्छिमार येऊन तलावात मच्छीमारी करतात, ते पकडलेल्या माश्यांपैकी काही या खडकावर बसलेल्या या मगरींना खायला घालतात त्यामुळे सुद्धा त्या आता मांस खाण्याच्या आधीन झाल्या असून आमच्या लोकांवर हल्ले करत आहेत. शिवाय तलावात एवढ्या मगरी कधीच नव्हत्या या हल्ला करणाऱ्या घटक मगरी बाहेरून पकडून आणून इथे सोडल्या सुद्धा असतील.”

“बेशुध्द अवस्थेत असणाऱ्या भुरे यांना आम्ही त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांना शुद्ध आली आहे.” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!