पवई तलाव ओसंडून वाहू लागला

 

@रविराज शिंदे, सुषमा चव्हाण

निवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे पवई तलाव तुडूंब भरून रविवारी वाहू लागला. पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी रविवारी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन करून याबाबत माहिती विचारली असता त्यांनी रविवारी दुपारी १२.३० वाजता तलाव भरून वाहू लागल्याची पुष्टी केली.

तलाव क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस पडला की पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत असते. जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर शनिवार पासून पुन्हा जोर धरला आहे. शनिवारी आणि रविवारी मुंबई उपनगरात झालेल्या पावसामुळे पवई तलाव भरून, आंबेडकर उद्यान भागात असणाऱ्या डॅमवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि सकाळपासूनच पावसाने सूर धरल्यामुळे पावसासोबतच डॅमवरून पडणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

डॅमवरून पडणारे पाणी पुढे एका कॅनॉलमार्गे मिठी नदीत सोडले जाते. या वाहत्या पाण्यात पडल्याने गेल्यावर्षी एक तरुण वाहून जाताना काही धाडसी तरुणांनी त्याला वाचवले होते. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी म्हणून तलाव भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पर्यावरण प्रेमींची नाराजी

पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंद असला तरी पर्यावरण प्रेमी मात्र नाराज आहेत. जोरदार पावसानंतरही ऑगस्ट महिन्यात भरून वाहणारा तलाव गेल्या काही वर्षात जुलै महिन्यात ओव्हरफ्लो होत असे, मात्र या वर्षी तेवढा मोठा पाऊस पडला नसतानाही केवळ सुरुवातीच्या पावसातच तो ओसंडून वाहू लागला असून, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘विशेष म्हणजे करोडो रुपये खर्च करून पवई तलावातील जलपर्णी हटवणे, गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे. अजूनही नवनवीन कामे सुरु आहेत प्रत्यक्षात मात्र यातील कोणतीच काम झाले नसून, उलट तलावाची पातळी अजूनच कमी झाली आहे आणि त्यामुळे थोड्या पावसातही तलाव ओव्हरफ्लो झाला आहे’ असेही ते पुढे म्हणाले.

निसर्गाच्या या सौंदर्याचा आनंद घेताना दुर्घटना घडू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे येथे येणाऱ्या पर्यटकांना करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!