पवई प्रेसवर पवईकरांच्या वतीने नगरसेवकांना दहा प्रश्न

 

prashn1हानगरपालिका निवडणूका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात सध्याचे नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर काय काम केले? कोणत्या समस्यांचे निवारण केले? याचा लेखाजोखा समोर यावा म्हणून, पवईकरांचे प्रतिनिधित्व करत रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक ११५ चे अध्यक्ष विनोद लिपचा यांनी ‘पवई प्रेस’च्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांना दहा प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरे त्यांनी स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून पवईकरांना द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. जर ठरलेल्या वेळेत नगरसेवक किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी या प्रश्नांची उत्तरे नाही दिली तर नगरसेवकांच्या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा लिपचा यांनी याच माध्यमातून दिला आहे.

लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडावा यासाठी वेळोवेळी माध्यमांनी पुढाकार घेतलेला आहे. पवईच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत म्हणून, सर्व पक्षीय नेतृत्व एकत्रित करून ‘पवई प्रेस’ची निर्मिती एक वर्षापूर्वी करण्यात आली आहे. याच माध्यमातून रिपाईचे वार्ड अध्यक्ष विनोद लिपचा यांनी स्थानिक नगरसेवकांना विचारलेले संक्षिप्त प्रश्न पुढील प्रमाणे आहेत.

प्रश्न क्र.१) शिवकृपा बिल्डिंगच्या तळमजळ्यावरील महानगरपालिकेच्या दवाखान्यास प.पु.डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी २००७ पासून पाठपुरावा करत असूनही त्याचे नामकरण का झाले नाही? या संदर्भात तुम्ही पालिकेकडे पाठपुरावा केला आहे का?

प्रश्न क्र.२) पवईमध्ये खेळाचे मैदान नसल्याने या भागातून देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी खेळणारे खेळाडू निर्माण होणार का?

प्रश्न क्र.३) पवईकरांसाठी दिलेल्या हरीशचंद्र मैदानास लोखंडी ताळेबंद गेट, लोखंडी पत्राच्या शेड, आणि कचऱ्याचा ढिग कशासाठी?

प्रश्न क्र.४) चैतन्यनगरमधील ‘दुर्गादेवी उद्यानाची’ दुरुस्ती व लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसवण्यासाठी अजून किती कालावधी लागणार आहे?

प्रश्न क्र.५) पवईतील ज्येष्ठ नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी आणि बसण्यासाठी त्यांचे हक्काचे ठिकाण कधी मिळणार?

प्रश्न क्र.६) प्रा. पिल्ले यांनी पवई किंवा पवईकर यांच्यासाठी असे कोणते कार्य केले आहे, ज्याच्या खातर तुम्ही त्यांचे नाव रस्त्याला देण्यासाठी आतुर होतात? पालिका रुग्णालयाला प.पु.डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी तुमचा विरोध का? आणि कशासाठी?

प्रश्न क्र.७) आय.आय.टी मार्केट, आय.आय.टी मेन गेट, पंचकुटीर याठिकाणी रेडिमेड शौचालय केव्हा बसवणार आहात? गणेश विर्सजन घाटावर बसवलेले शौचालय केव्हा सुरू करणार आहात?

प्रश्न क्र.८) सामान्य पवईकरांनी पोटाची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर उभारलेली दुकाने तोडताना कोणतीही दया दाखवली गेली नाही. तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेले वाचनालय/आरामगृह फुटपाथवरच उभे केले आहे, मग त्यावर कारवाई का नाही?

प्रश्न क्र.९) गोखलेनगर, गौतमनगर, इंदिरानगर येथील सार्वजनिक शौचालय का आणि कशासाठी तोडण्यात आली? हे सर्व कुणाच्या हितासाठी केले गेले? पवईकरांच्या की तुमच्या स्वत:च्या?

प्रश्न क्र.(१०) प्रशासन सार्वजनिक शौचालयाच्या मुद्यावर कानाडोळा करत असल्याने सर्वपक्षीय केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. ज्यानंतर सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर, ३ जून २०१५ पासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत, असा पत्रव्यवहार पालिका ‘एस’ विभागास आम्ही केला असताना, तुम्ही १ जून २०१५ ला पत्र लिहून हे उपोषण मागे घ्यावे, मी हा प्रश्न लवकरच सोडवत आहे, न सोडवल्यास मी स्वतः तुमच्या सोबत उपोषणाला बसेन, असे म्हटला होतात. तुम्ही शौचालय बनवण्यास अयशस्वी झाला आहात, तेव्हा पवईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही उपोषणाला कधी बसणार आहात?

या प्रश्नांवर अदयाप नगरसेवक किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून पवई प्रेसवर कोणतेही उत्तर किंवा प्रतिक्रिया नोंदवली गेली नाही आहे. जे पाहता १० जानेवारी पर्यंत उत्तराची वाट पाहणार असून, नगरसेवकांनी पवईकरांच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने विचार केला नाही, तर एस विभागाकडे पत्रव्यवहार करून पवईकरांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून, नगरसेवकांच्या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा लिपचा यांनी याच माध्यमातून दिला आहे.

इतर पक्षाच्या आणि या मुद्यांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांचे मत मात्र या बाबतीत वेगळे आहे. ‘लिपचा यांनी पद मिळाल्यापासून हा मुद्दा लावून न धरता, आताच मुद्दा उचलला, हे सर्व खटाटोप कशासाठी हे सगळे समजू शकतात. येत्या काही दिवसात ते त्यांच्या या सगळ्या प्रश्नांवर आपले मत प्रकट करणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

नगरसेवकांच्या प्रतिनिधीनीही आपले नाव जाहीर न होण्याच्या अटीवर सांगितले “लिपचा यांचे हे सगळे प्रश्न बिन बुडाचे आहते. यातील अनेक प्रश्नांवर पाठपुरावा चालू असून, काही मंजुरीच्या स्तरावर आहेत, तर काहींसाठी अजून वेळ लागू शकतो. ज्येष्ठ नागरिक आणि खेळाचे मैदानाच्या त्यांच्या प्रश्नांमध्येच त्यांचे त्यांनी उत्तर सांगितलेली आहेत, मग प्रश्न उरतातच कुठे? नगरसेवकांनी कामे केली आहेत असे ते स्वतः आपल्या प्रश्नांमधून मंजूर करत आहेत, वरून असे बिन बुडाचे प्रश्न विचारून ते पवईकरांचे लक्ष वेधण्याचा असफल प्रयत्न करत आहेत.

ते पुढे म्हणाले “सार्वजनिक शौचालय उभारणीस सुरवात झाली असून, आम्ही यापूर्वीही नवीन वर्षाच्या सुरवातीपर्यंत गणेश विसर्जन घाटावरील शौचालय सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. इतर शौचालयांचा साचा तयार होत असून तेही लवकरच जागेवर ठेवून काम सुरु होईल. मुळात आम्ही त्यांना बोलून उत्तर देण्यापेक्षा, ज्यासाठी ते प्रश्न आहेत ती कामे करून त्यांना प्रत्यक्ष उत्तर देणार आहे.”

   

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!