पवई विहारमध्ये गाडीवर पडले झाड, जीवित हानी नाही

powai vihar tree

विक्रोळी अग्निशमन दल अधिकारी रस्त्यावर पडलेले झाड हटवण्याचे काम करताना. छायाचित्र – प्रमोद चव्हाण

वई विहार येथील इमारत क्रमांक १ मधील १५ ते १६ वर्ष जुने झाड, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक मुळासकट उन्मळून रोडवर उभ्या असणाऱ्या एका गाडीवर पडल्याने गाडीचा चुराडा झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या वेळेस रस्त्यावर कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली, परंतु कॉम्प्लेक्सच्या प्रवेशाच्या काहीच अंतरावर संपूर्ण रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहतूक खोळंबली आणि स्थानिकांना वळसा घालून आपल्या घरी पोहचण्याची बारी आली. या घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा रस्त्यावर पडलेले हे झाड हटवले.

‘पवईच्या झाडांना नक्की झाले आहे तरी काय? या मथळ्याखाली ‘आवर्तन पवई’ने बातमी करून जबाबदार अधिकाऱ्यांचे पवई भागात झालेल्या झाडांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते. सुरुवातीला काही दिवस हालचाली दाखवणारे प्रशासन काही काळाने मात्र गळपटले. याचाच परिणाम स्वरूप बुधवारी रात्रीच्या वेळेस पवई विहार इमारत क्रमांक एक सुरक्षा रक्षकाच्या केबिन जवळ असणारे गुलमोहराचे झाड वजन सहन न झाल्याने व मूळ कमकुवत असल्यामुळे पडले. इमारतीची सुरक्षा भिंत आणि जाळीला तोडत हे झाड इमारती समोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या होंडा आय१० कार क्रमांक GJ 6 DG 6012 वर पडले, ज्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

झाड पडताना आणि गाडीवर पडल्यावर झालेल्या मोठ्या आवाजामुळे अनेक नागरिकांनी सैरावैरा पळत रस्त्यावर धाव घेतली. मुख्य रस्त्यावरच झाड आडवे पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची कोंडी झाली होती. लेक होम मार्गे गाड्यांना पर्यायी मार्गाने फिरवत विक्रोळी अग्निशमन दलाने झाड कापून रस्त्यावरून हटवले.

याबाबत बोलताना अनेक नागरिकांनी महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारावरती ताशेरे ओढत त्यांनी दुर्लक्ष केल्याचा सूर आळवला होता. गटाराचे काम करताना झाडाची मुळे कापून टाकल्याचा आरोप ही काही स्थानिकांनी यावेळी केला. अशी अनेक जुनी झाडे आजही परिसरात आहेत आणि अजून ही कोणतेही झाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा पालिकेला याबाबत तक्रार करून झाडांचा अस्ताव्यस्त वाढलेला भार छाटून कमी करण्याबाबत नागरिकांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!