पिंपळाच्या झाडाची पालिकेच्या संगनमताने कत्तल, संतप्त पवईकरांचा आंदोलनाचा इशारा

रविराज शिंदे
treeयआयटी: निसर्ग संवर्धनाच्या नावावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महानगरपालिकेतर्फे आयआयटी रमाबाई आंबेडकरनगर येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याऐवजी, बांधकामास अडसर निर्माण करणारे पिंपळाचे झाड छाटण्याचे काम केल्याने स्थानिक आक्रमक झाले असून, त्यांनी पालिका अधिकारी आणि झाडांची कत्तल करणाऱ्या धनदांडग्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पोलीस, महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.

आयआयटी मेनगेट समोरील माता रमाबाई आंबेडकर नगर, चिंतामनी बुध्दविहार येथे गेली ४० वर्ष एक जुने पिंपळाचे झाड आहे. झाडापासून काही अंतरावर गेल्या काही दिवसांपासून एका घराचे बांधकाम सुरु असून, त्या बांधकामात हे झाड अडसर बनत होते. दोन दिवसापूर्वी अडसर करणारे हे झाड धनदांडगे व वृक्षतोड माफियांकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत छाटण्यात आले. सदर कृत्यामुळे स्थानिक जनता संतप्त झाली असून, त्यांनी भारिप बहुजन महासंघ व धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या मार्फत, महानगरपालिका तसेच वृक्षतोड माफियांवर कठोर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र पवई पोलिस ठाणे, महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना पाठवले आहे.

“झाडे लावा झाडे जगवा”चे संदेश देवून व पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी महानगरपालिकेकडून एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च केला जात असतानाच, दुसरीकडे मात्र केवळ थोड्याश्या मोहापायी काही पालिका अधिकारी धनदांडग्यांच्या बांधकामास आणि झाड पाडण्यास परवानगी देवून पर्यावरणाचा नाश करत आहेत. जे पाहता असे आदेश देवून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी पालिकाच सर्वस्वी जबाबदार असल्याच आरोपही आता पवईकरांकडून केला जात आहे.

letter‘आवर्तन पवई’शी यासंदर्भात बोलताना स्थानिकांनी सांगितले, “गेली अनेक वर्ष हळूहळू करून एक बेकायदेशीर बांधकाम या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या बाजूला सूरू होते, जे आजतागायत सुरूच आहे. या बेकायदेशीर बांधकामाला अडसर करणाऱ्या पिंपळाच्या झाडावर गेल्या चार वर्षापासून वृक्षतोड माफियांची वक्रदृष्टी होती. ज्याबद्दल बौध्द विकास मंडळ तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने झाड तोडण्यास विरोध दर्शवित त्यासंबंधीत तक्रारही महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे व पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर शांत झालेल्या या धनदांडग्यांनी अचानक चार वर्षानंतर पुन्हा हे पिंपळाचे झाड तोडण्याचा कट आखून, पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने भरदिवसा जीवंत पिंपळाच्या झाडाची कत्तल केली आहे.

या बेकायदेशीर कामाला व झाडाची कत्तल करण्याचा गुन्हा करणाऱ्यांना पालिका अधिकाऱ्यांचे अभय आहे, त्यामुळे माफियांनी राजरोसपणे हे कृत्य करून बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या भ्रष्ट अधिकारी व वृक्षतोड माफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा स्थानिक नागरिक तसेच भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारिपचे वार्ड अध्यक्ष सुभाष गाडे, धम्मदीप सोशल अँण्ड कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र धिवार, बौध्द विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल बिरारे यांनी दिला आहे.

“पालिकेतर्फे झाडे तोडण्यापूर्वी किंवा छाटण्यापूर्वी एक नोटीस त्या झाडावर लावली जाते. ज्यास कोणी विरोध दर्शवला नाही, तर झाड हटवले किंवा छाटले जाते. पालिकेतर्फे लावण्यात आलेली नोटीस बऱ्याच वेळा स्थानिकांच्या निदर्शनास येत नसल्याने, अचानक येऊन काम सुरु झाल्यावर स्थानिकांचा विरोध होतो. पालिकेने लोकांच्या लक्षात येईल अशा पद्दतीने नोटीस लावणे आवश्यक आहे. स्थानिकांनीही कारवाई होताना त्यासाठी अनुमती आहे का? कशा प्रकारची अनुमती आहे? हे पडताळणे जरुरी आहे. बेकायदेशीर काम होत असल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याला किंवा नियंत्रण कक्षाला फोन करून कारवाई थांबवता येऊ शकते.” असे प्लॅन्ट एंड एनिमल वेलफेयर सोसायटीचे सुनिष सुब्रमानियम यांनी यासंदर्भात आवर्तन पवई’शी बोलताना सांगितले.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!