****प्रीत****

अमित मरगजे (स्वतेज)

तिच्यासाठी मला लिहायचं होत, वाट पाहत होतो योग्य वेळ यायची,  बहुदा आजपासून सुरुवात करायला हरकत नाही.

राजेश, मी यापूर्वी यांच्याविषयी लिहिलंय, हा कसा आहे आणि का तसा आहे, हे आजवर नाही कळलं, पण याच व्यक्तिमत्व मला विचार करायला नेहमीच भाग पाडत. पुन्हा पुन्हा मी आणि माझे शब्द या माणसासाठी लिहू लागतात. आम्ही एकाच वयाचे म्हणून कदाचित आमचे विचार जुळत असावेत. काल तो भेटला आणि जे बोलून गेला ते लिहावंसं वाटलं, आता हि कहाणी पुढे लिहिण्यासाठी याला वारंवार भेटावं लागणार.

मी हे लिहितोय तेव्हा मला माहित आहे, कदाचित हे ती वाचणार आहे आणि समजून सुद्धा जाईल हे तिच्यासाठी लिहिलंय, मलाही ते हवय.

चला मग इथून पुढे ऐकूयात या कहाणीला राजेशच्याच शब्दात !

नवीन नोकरी शोधत होतो, सध्याचा ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं आणि नवीन जॉबसाठी ऑफर आली, इंटरव्हूव शेड्युल झाला आणि मी नवीन ऑफिसला पोचलो.

शक्यतो इंटरव्यू फेल होणं माझ्या रक्तातच नाही त्यामुळेच माझं तिथे सिलेक्शन झालं. ठरलेल्या दिवशी वेळेच्या आधीच मी कामाच्या ठिकाणी पोहचलो. पहिलाच दिवस होता माझा, ऑफिस उशिरा उघडतं हे माहित नव्हतं. ऑफिस उघडायची वाट बघत असताना ती समोर दिसली. मला पाहून हसली, तिच्या हसण्यात मला आदरच दिसला आणि म्हणूनच मी पण हसून तिचा सन्मान केला. हि सुरुवात असावी बहुदा, तो दिवस असाच गेला. पुढे १५ – २० दिवसांत विशेष काही घडलं नाही. रोज जाता-येता भेटायचो, ऑफिसमध्ये एकमेकांसमोर आलो कि हसणं एवढंच काय ते घडत होते.

तीच्याबाबत कस आणि किती लिहिणार, जस जशी गोष्ट पुढे जाईल तुम्हाला आपोआप कळेल. सध्या फक्त एवढेच म्हणेन की क्षितिजावर उगवणाऱ्या सूर्याचा प्रतिबिंबासारखी निरागस आणि लोभस वाटते ती मला.

एक दिवस अचानक ऑफिसमध्ये तिने ट्रीट दिली, नंतर कळलं तिचा जॉईनिंगची होती. मी आभार मानायला तिच्या जागेपर्यंत गेलो आणि थँक्स बोलून निघणार तेवढ्यात तिने अगदी सहज म्हटलं ‘तुम्हालाही द्यावी लागेल’! माझा तिच्यासोबतचा हा बहुदा पहिला संवाद असावा. तिचा ओठांची हालचाल, चेहऱ्यावरचे हावभाव, रोचक हास्य आणि मंजुळ आवाज सगळं काही भुरळ पडणारे होते. एखाद्या छोट्याशा व्हाळेतून शांतपणे वाहणाऱ्या पाण्यासारखा आवाज माझा कानाला भिडत होता. व्हाळ हा ग्रामीण शब्द आहे, व्हाळ म्हणजे पाटाचं पाणी. माझं मन फुलपाखरू झालं होत.

आज पस्तीशीच्या घरात असताना, विशीच्या मुलींबाबत असणार आकर्षण, लक्षणीय होत. माझ वय कुठेतरी मनाला बोचत होत, पण ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असत’ असं जो कोणी बोलून गेला त्याला मनोमन धन्यवाद देत होतो.

हरवू लागल्यात वाटा

आणि आयुष्याचे तरंग

समोर अशी विठ्ठल तू

मन माझे तुकया अभंग – स्वतेज

त्या दिवसानंतर हळूहळू आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो होतो. तशी विशेष काही गप्पा व्हायच्या नाहीत पण बोलायचो एवढेच. सुप्रभात ते सुसंध्या इथपर्येंत पोचलेलो म्हटलं तरी हरकत नाही. तिच्याठायी असलेली मैत्री आणि माझा मनात फुलत असलेला प्रेमांकुर, सगळं काही स्वप्नवत होतं. सर्वकाही अकल्पनीय आणि अनपेक्षितच घडत होते.

एकेदिवशी कामानिमित्त तिच्यापाशी बसण्याचा योग आला. बराच वेळ तिथे तिच्याजवळ होतो पण माझा डोळ्यांचा लपंडाव आणि भावनांमधील घालमेल मनातील सर्वकाही उघड करीत होता. माझ्या बोलण्यात आणि डोळ्यात तिला बहुदा माझं प्रेम स्पष्ट जाणवत असाव. मी तरी काय करणार मन आणि शरीर एकमेकांची साथच देत नव्हत.

बोलण्याच्या ओघातच तिने तिच्याविषयी सांगायला सुरुवात केली. तिची कहाणी ऐकताना तिच्याबद्दल एक विलक्षण आदर आणि औत्सुक्य वाढलं.

ती मला सर म्हणते

मी म्हटलं,

सर सर सरकवायला

फार वेळ लागत नाही

समजुन नसेन घ्यायचं

तर गैरसमज करायला हरकत नाही – स्वतेज

अव्यक्त प्रेम, तिच मला आदराने बोलावन आणि माझी ऑफिसमधली प्रतिमा हे सगळे आता माझ्या भावनेच्या आड येत होते. मला हे कुंपण तोडायचं होत पण सगळ्या गोष्टी अचल ठेवून.

प्रतिमा आणि ऑफिस सांभाळून तिच्या मनामध्ये माझ अस्तित्व निर्माण करायचं हाच एक यक्ष प्रश्न आता माझा समोर होता.

आज सकाळी तिचा फोन आला, तसं रोजच तासंतास बोलतो आम्ही पण रोज काय बोलणार? विषय नको? तिने विचारलंच बोअर झालायस मला? मी मिश्कीलपणे, तुला कसं कळलं? मग काय एका क्षणात गंगा जमूना वाहू लागल्या. काय बोलणारं ती?

प्रेम असावं! इतकंही नाही कि मग त्याचा वीट यायला लागे. प्रेमात थोडीशी मोकळीक हवीच. उगाचच ते कोंडल्यागत नको. हेच तिला समजवायचंय. मला खात्री आहे, तिला समजेल हे सुद्धा एक दिवस. यावर कुसुमाग्रजांनी खूप छान लिहिलंय

प्रेम कर भिल्लासारखं

बाणावरती खोचलेलं

मातीमध्ये उगवून सुद्धा

मेघापर्यंत पोहोचलेलं

प्रेम असं असावं, निस्सीम, निस्वार्थी आणि आकाशाला झेप घेणार

तर मी शेवटी होतो तिचा कहाणीपाशी, आई-वडील आणि दोन बहिणी एवढाच तिचा परिवार. दोन्ही बहिणींची लग्न झालेली, पर्याय नाही म्हणून तिला नोकरी करावी लागत होती. अन एक मी होतो ज्याला तिचा वयात असताना शिक्षणाचा कंटाळा आला म्हणून नोकरी करायची होती. किती फरक होता नाही?  दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर होतो आम्ही दोघे. खरंच परिस्थिती काय असते हे दुरून नाही पाहता येत, ती अनुभवावी लागते.

तिचे वडील पक्षाघाताच्या तिन झटक्यानंतरही आपल्या पावलांनी चालण्याचा प्रयत्न करत होते आणि हि घर चालवायला धडपडत होती. त्यातच शेवटच्या वर्षाचीही बाहेरून परीक्षा देत होती. माझ्या बाबतीत मात्र आई बाबा अभ्यास कर म्हणून मागे लागले तरी मी उडानटप्पूपणात वेळ घालावायचो. आज कोणीतरी अभ्यासासाठी वेळ शोधीत आहे पण तोच भेटत नाही.

परमेश्वरा, तू निर्दयी आहेस

असं नाही म्हणणार मी

पण तू न्याय करतोस असंही

एवढ्यात नाही मानणार मी – स्वतेज

हाच तिचा वर्तमान मला आणि माझ्यातल्या माणसाला जाग करत होता. प्रेम वगैरे सर्व काही नगण्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आदर तुमचा मनात निर्माण होतो, तेव्हा स्वार्थ किंवा फसवणूक या सगळ्या भावना कुठेतरी पडद्याआड निघून जातात. वासनेने बरबटलेल्या श्वापदांचीही, एक निर्मळ,  हरिणी शिकार करू शकते असं काहीसं म्हणावसं लागेल.

तिच्याबद्दलच आकर्षण वाढत असतानाच मी एका टूरवर गेलो, सोबत मालक सुद्धा. जाताना परत केव्हा येणार? तिने विचारलं आणि मी मिश्कीलपणे बोललो ‘का एमडीशिवाय करमत नाही’, ती हसली फक्त.

या टूरवेळी फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती, ती तिचीच होती सांगायला नकोच. आमची सामाजिक मैत्री त्यादिवशी झाली आणि मग सोबत व्हाट्सअँपनेही आम्हाला एकमेकांशी जोडलं. फारसं काही नाही पण जुजबी बोलू लागलो होतो. टूर फार काहींनाही मात्र एक छान मैत्रीण देऊन गेली.

पुन्हा आल्यानंतर नेहमीच ऑफिस ऑफिस खेळीत होतो. रोज यायचं तिला पाहायचं आणि घरी जायचं अस काहीसं. चाटींगमुळे जवळीक वाढत होती पण एका मैत्री इतकीचं. वेगळं काही घडावं असा काही घडतच नव्हतं किंवा मी त्यास तूर्त पात्रही नव्हतो. काहीतरी होत तिचा आयुष्यात या क्षणीचा असलेला भूतकाळ आणि त्या क्षणीचा वर्तमान. कोणीतरी आले होते तिचा आयुष्यात.

……क्रमशः

या कहाणीतील पात्र आणि घटना काल्पनिक आहेत, त्याचा कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा

पुढील गोष्ट वाचा उद्याच्या (रविवारी) अंकात

______________________________________________________________

लेखक अमित मरगजे हे “स्वतेज” या टोपण नावाने लिखाण करतात. ते एक्सपोर्ट कंपनीत उच्च पदावर काम करत असून, कामानिमित्त विविध ठिकाणी प्रवास करताना त्यांना लिखाण करणे आवडते. आजपर्यंत त्यांनी स्वतेज या नावाने अनेक चारोळ्या, लघुकथा, लेखमालांचे लिखाण केले आहे. लेखकाला आपण [email protected] वर संपर्क साधू शकता.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!