मोबाईल चोर पवई पोलिसांच्या जाळ्यात

mobile chorचालत्या बसमधून लोकांचे मोबाईल फोन, पाकीट चोरून पसार होणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव इजाज शेख (३८) असे असून, तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पवई पोलिसांनी दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करून त्याला तुरुंगाची हवा दाखवत असे गुन्हे करणारांना एक जरब बसवलेली आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या लोकांची पवई भागात मोठी संख्या आहे. कामानिमित्त सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करणाऱ्या लोकांच्या गर्दीचा फायदा काही चोरांनी घेत हैदोस घातला आहे. गर्दीच्या काळात प्रवास करणाऱ्या लोकांचे खिशातील मोबाईल, पाकीट गायब होऊ लागली आहेत.

या संदर्भात मिळणाऱ्या वारंवारी तक्रारी पाहता, पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त समद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथक तयार करून पवई परिसरातील बस स्थानके, मोक्याची ठिकाणे येथे साध्या वेशात पोलीस नियुक्त केले होते. काही पोलीस प्रवासी बनून बस मधून प्रवास करून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते आणि त्याच फलिताच्या रुपात इजाज रंगेहात पोलिसांच्या हाती लागला.

“आम्ही सतत प्रत्येक संशयित हालचालीवर नजर ठेवून होतो. पाठीमागील आठवड्यात आम्ही नजर ठेवून असताना इजाजच्या संशयित हालचाली पाहता आम्ही त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३५००० रुपये किमतीचा एक आणि ६००० रुपये किमतीचा एक असे दोन चोरीचे फोन आम्ही हस्तगत केले आहेत. भादंवि कलम ३७९ (चोरी)च्या गुन्ह्यात त्याला अटक करून कोर्टात सादर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी समीर मुजावर यांनी सांगितले.

“इजाजसारखे अजून ही काही लोक परिसरात हे गुन्हे करत होते, त्यांना इजाजच्या अटकेमुळे जरब बसली असून पाठीमागील काही दिवसात गुन्ह्यांना आळा बसलेला आहे. गोपाळकाला आणि गणेशोत्सव सारख्या उत्सवांच्या काळात परिसरात वाढणाऱ्या गर्दीची संख्या पाहता, पुन्हा असे गुन्हे बोकाळू नयेत म्हणून आम्ही प्रत्येक संशयीत हालचालीवर नजर ठेवून आहोत” असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!