रुग्णवाहिका चालकांकडून पोलिसांचीही लूट

रुग्णवाहिकाकोरोनाच्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस असे सगळेच आपल्या जीवावर उदार होत नागरिकांच्या रक्षणासाठी लढत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही लोकांनी आपले धंदे जोमात आणले आहेत. सार्वजनिक रुग्णवाहिका सगळीकडेच पोहचू शकत नसल्याने काही खाजगी रुग्णवाहिका चालक/मालक मनमानी करत लूट करत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी काम करणाऱ्या देवदूतांना सुद्धा यांनी सोडले नसून, ‘तुम्ही काही वेगळे नाही’ म्हणत त्यांना ही लुटत आहेत. पवई पोलीस ठाण्यातील पॉझिटीव्ह मिळून आलेल्या एक कर्मचाऱ्याला ५ ते ६ किमी अंतरावर असणाऱ्या रुग्णालयात पोहचवण्यासाठी एक खाजगी रुग्णवाहिका चालकाने चक्क ७ हजार रुपये आकारले आहेत.

पवई पोलीस ठाण्यात काम करणारे २९ वर्षीय पोलीस शिपाई ३ दिवसापासून सर्दी तापाने त्रस्त होते. त्यांनी जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात तपासणी करून घेतली असता २३ एप्रिलला ते पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यांना पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एक रुग्णालयात दाखल व्हायचे असल्याचे त्यांनी रुग्णालयाला विनंती केली.

यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली असता सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. एक खाजगी रुग्णवाहिकेच्या चालकाने त्यांना जोगेश्वरी ते पवई या प्रवासासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली.“५ ते ६ किलोमीटरसाठी एवढे पैसे का असे विचारले असता, चालकाने ‘यायचे असेल तर या, नाहीतर मी जातो’ असे उर्मठ उत्तर दिले. मी पोलीस कर्मचारी असून, कर्तव्यावर असताना लागण झाली असल्याचेही सांगून पाहिले, मात्र ‘आता सगळेच सारखे’ असे उत्तर त्या रुग्णवाहिका चालकाने दिले. असे याबाबत बोलताना त्या कर्मचाऱ्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा: पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी फरफट

“कसेबसे पैशांची जुळवाजुळव करून त्याला पवई येथील रुग्णालयात आणण्यात आले, मात्र त्याचा अहवालात लक्षण नसल्याची नोंद असल्याचे सांगत, शासकीय नियमानुसार या रुग्णालयाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हाला त्याला परिसरात असणाऱ्या एक पालिका विलगीकरण केंद्रात ठेवावे लागले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“अखेरट्रामा  केअर रुग्णालयातून त्याचा अहवाल बदली करून आणल्यानंतर रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

कोरोनाच्या संसर्गापासून परिवार अनभिज्ञ

बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा भाऊ हा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे, तर त्याचे आई वडील हे गावी असतात. आपल्या परिवाराला माहिती मिळाल्यास त्यांची चलबिचल होईल. या लॉकडाऊनच्या काळात त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून त्याने त्यांना याबाबत कल्पनासुद्धा दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा: ऑनलाईन नोकरीच्या शोधात असणाऱ्या पवईतील तरुणीला गंडा

पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळतेय

कोरोनाशी सामना करण्याच्या काळात अशा सगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे आधीच आपल्या परिवारापासून दूर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल आता हळूहळू ढासळू लागल्याचे मत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!