रोहित वैमुला आत्महत्येच्या निषेधार्थ पवईकरांचा रास्ता रोको

ठिकठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते व जनतेचा मूक मोर्चा, रास्ता रोको आणि कॅन्डेल मार्च
Screenshotहैद्राबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वैमुला याच्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटत असताना, शनिवारी सकाळी आयआयटी पवई येथील नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून व काही काळ रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. युथ पॉवर सह धम्मदीप सोशल कल्चरल असोसिएशन, साय्यमो व्हुमन संस्था, स्वराज्य युथ क्लब, माता रमाई कलामंच यांच्यावतीने तोंडावर काळ्या पट्या लावून परिसरात मूक मोर्चा काढून शांततेत निषेध नोंदवला.

रिसर्च स्कॉलर म्हणून ओळख असणाऱ्या रोहित वैमुला या विद्यार्थ्याने, विद्यार्थी संघटनेच्या दबावाखाली येऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटत असून देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून याचा निषेध व्यक्त करत आहे. शनिवारी सकाळी पवईमध्येही विविध संघटना आणि आंबेडकरी विचारी जनतेने रोहितला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यास अटक करा, रोहितला न्याय दया, विद्यार्थ्याची हत्या म्हणजे देशाच्या भविष्याची हत्या अशा घोषणा देत पवईमधून निषेध मोर्चा काढला. आयआयटी मेन गेट येथे काही काळ रास्तारोको करून हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू आप्पाराव पोडीले, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर गुन्हा नोंद होऊन, रोहितच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्वांना  कडक शिक्षा व्हावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

तर दुसरीकडे युथ पॉवर सह धम्मदीप सोशल कल्चरल असोसिएशन, साय्यमो व्हुमन संस्था, स्वराज्य युथ क्लब, माता रमाई कलामंच यांच्या वतीने तोंडावर काळ्या पट्या बांधून, आंबेडकरी विचारवंत विद्यार्थी रोहित वैमुला यास आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या मनुवादी, जातीयवादी हैद्राबाद विद्यापिठाचा जाहीर निषेध आणि शहीद रोहित वैमुला यांस आदरांजली वाहण्यासाठी ‘शांततापूर्ण मूक कॅन्डेल मार्च’चे आयोजन केले होते.

आयआयटी मेन गेट येथून सुरु झालेला हा ‘मूक कॅन्डेल मार्च’ गावठाण, हिरानंदानी, रमाबाई आंबेडकरनगर, चैतन्यनगर, पद्मावती रोड मार्गे थेट महात्मा ज्योतीराव फुले नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोपीत करण्यात आला. सुमारे १५० पेक्षा जास्त महिला, पुरुष, विद्यार्थी तरुण मुलांसह पवईकर हातात मेणबत्या प्रज्वलित करून, तोंडाला काळी पट्टी बांधून या कॅन्डेल मार्चमध्ये सहभागी झाले होते.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!