तोतया आयएएस अधिकाऱ्याला एक वर्षाचा तुरुंगवास

००५ बॅचचा भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असल्याचे सांगून साकीनाका परिसरातील दोन व्यावसायिकांना २६.४८ लाखाला गंडा घालणाऱ्या, ८ वी पास तोतया आयएएस अधिकाऱ्याला अंधेरी सत्र न्यालयाने एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दुसऱ्या सावजाच्या शोधात असताना सुरेश यादव (४२) याला साकिनाका पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती.

“उत्तरप्रदेशसह अनेक राज्यात अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक होऊन २००६ ते २०१२ असा काळ त्याने कोठडीतच घालवलेला आहे. ज्यानंतर त्याने मुंबईमध्ये अर्धा डझन पेक्षा अधिक लोकांना आपल्या उत्तम इंग्रजीच्या बळावर आयएएस आधिकारी असल्याचे सांगून ठगले आहे. यामध्ये साकीनाका येथील दोन व्यावसायिकांचा सुद्धा समावेश आहे. याच गुन्ह्यात सोमवारी त्याला शिक्षा सुनावण्यात आली” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

शिक्षकाच्या नोकरीत चांगले उत्पन्न मिळत नसल्यामुळे सुलतानपूरचा असलेला सुरेश यादवने एप्रिल २०१६ मध्ये मुंबईला येऊन साकीविहार येथील एका इमारतीत वॉचमेन म्हणून नोकरी करावयास सुरुवात केली. सोसायटीत राहणाऱ्या आरिफ खान (४४) यांच्याशी ओळख वाढवत, उत्तम इंग्रजीच्या आधारावर त्यांना आपली ओळख २००५ बॅचचा बिहार कॅडरचा आयएएस अधिकारी असल्याची करून दिली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे राजकीय दबावाखाली सस्पेंड केले आहे. वाढत्या धोक्याला पाहून त्याने मुंबईत वॉचमेन म्हणून नोकरी स्विकारल्याचे सांगून त्याने खान यांचा विश्वास संपादन केला होता.

एक दिवस अचानक खान यांच्या फोनवर साकीनाका पोलीस स्टेशनमधून फोन आला व ‘यादव यांचे दिल्ली सिलेक्शन बोर्डाने सस्पेंशन परत घेतल्याचे सांगा’ असा निरोप दिला. ज्यानंतर खान यांचा यादव हा खरेच आयएएस अधिकारी असल्याचा विश्वास झाला. खान जेव्हा यादवला हा निरोप देण्यास गेले तेव्हा ‘हो माझा फोन युपीचा आहे, इथे लागत नाही म्हणून मी तुमचा नंबर दिला होता’ असे त्यांना सांगितले.

“एवढा मोठा अधिकारी वॉचमेनचे काम करत असून, कुठेतरी कोणपाड्यात राहतो म्हणून खान यांनी आपल्या स्टोअर हाऊसमध्ये त्याच्या राहण्याची सोय केली. त्यास दिल्लीला जाण्यासाठी तिकीट आणि तीस हजार रुपयांची सोय केली. मुंबईत परतल्यावर खर्चासाठी पैसे लागतील म्हणून आपले डेबिट कार्ड व पिन नंबर दिला. महिन्याभरात १७.३८ लाख रुपये काढल्यानंतर मे महिन्यापासून यादव गायब झाला आहे आणि त्याचा फोनही बंद येऊ लागल्यानंतर खान यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केली होती.

तपासात यादव याने ठाणे आणि मुंबई भागात अजून काही लोकांना अशाच प्रकारे ठगवले असल्याचे समोर आले. खान यांच्याकडून पैसे घेऊन दिल्लीसाठी निघालेला यादव मुळात तिकडे गेलाच नव्हता, तिकीट रद्द करून त्याने ठाण्यात एक आठवडा वास्तव्य केले होते. परतल्यावर खान यांचे १७.३८ लाख रुपये घेऊन आपल्या घरी युपीला पळ काढला होता.

वीस वर्षापासून त्याने अशा प्रकारे खोटे आयएएस अधिकारी असल्याचे सांगून लोकांना ठगने सुरु केले होते. २००५ साली वकील असणाऱ्या शोभालाल यादव यांची फसवणूक केल्यानंतर युपी, बिहार, गाझियाबाद, ओरिसा, वेस्ट बेंगाल, दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्याने अनेक लोकांना आयएएस अधिकारी असल्याचे सांगून ठगवले असल्याचेही तपासात समोर आले होते. यातील अनेक गुन्ह्यात त्याला अटकही झाली होती, मात्र तो पुन्हा त्याच मार्गाने जात होता.

यादवच्या शोधात युपीला पोहचलेल्या साकीनाका पोलिसांच्या तपासी पथकाला तो पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माग काढत सावजाच्या शोधात असलेल्या यादवला पुण्यातून अटक केली होती.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!