हिरानंदानीत सुरक्षा रक्षक दिशाहिन बंदुकीच्या गोळीचा शिकार

छायाचित्र: माय पवई (My Powai)

छायाचित्र: My Powai

घाटकोपर पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दिशाहिन झालेल्या बंदुकीच्या गोळीने मंगळवारी हिरानंदानी येथील टोरिनो इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश दास (२८) यास आपले टार्गेट बनवले. सुरक्षा रक्षकाच्या मानेत घुसलेली गोळी पवई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आली असून, तो आता पूर्णपणे बरा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पवई पोलिसांनी गोळी चाचणीसाठी पाठवून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपर पोलीस प्रशिक्षण केंद्रातून येणाऱ्या बंदुकीच्या दिशाहीन गोळीचे हिरानंदानी भागात येणे काही नवीन नाही. १९८० च्या उत्तरार्धात घाटकोपर भटवाडी येथे बनवण्यात आलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दिशाहीन झालेल्या बंदुकीच्या गोळ्या सतत हिरानंदानी, आयआयटी, आदिशंकराचार्य मार्ग येथे येत असतात. या दिशाहीन गोळ्यांनी कधी कार, कधी इमारतीची भिंत, कधी खिडकीची काच तर कधी घरांच्या पत्र्यांना नेहमीच आपले शिकार बनवले आहे. २००६ आणि २००८ च्या घटना वगळता अनेक घटनेत स्थानिक थोडक्यात बचावलेले आहेत. मात्र मंगळवारी दिशाहीन झालेल्या गोळीने हिरानंदानी येथील टोरिनो इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश दासला आपले शिकार बनवले.

“काही दिवसांपूर्वीच टोरिनो इमारतीत रुजू झालेला प्रकाश हा मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुख्य प्रवेश द्वाराजवळील चौकीत नोंदी करत बसलेला होता. अचानक काहीतरी टणक गोष्ट येऊन त्याच्या गळ्याला उजव्या बाजूला लागल्याचे त्याला जाणवले. आघातामुळे त्याचा आवाज निघणे बंद झाले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होताना पाहून त्याला त्वरित पवई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेथे शस्त्रक्रिया करून ती टणक वस्तू काढली असता, ती बंदुकीची गोळी असल्याचे समजले” असे आवर्तन पवईशी बोलताना त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

“माहिती मिळताच जखमीला भेटून आणि घटनास्थळी जावून आम्ही घटनेची माहिती घेतली आहे. जखमीच्या मानेतून काढलेली गोळी आम्ही तपासण्यासाठी पाठवली असून, जखमीने कोणतीही तक्रार दिली नसल्याने, आम्ही वरिष्ठांना माहिती पुरवून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.”असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी सांगितले.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी स्थानिक मात्र पुरते धास्तावले असून त्यांच्याकडून हे प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासन मात्र विकासक हा विकास करण्याच्या हव्यासेत या प्रशिक्षण केंद्राच्या जवळ पोहचल्याने अशा घटना घडत असल्याचे बोलत आहे.

पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले, “गोळीच्या तपास अहवालानंतरच सर्व काही स्पष्ट होऊ शकेल. ती गोळी सरकारी बंदुकीतून कि खाजगी बंदुकीतून निघालेली आहे तेव्हाच स्पष्ट होईल; परंतु प्रथम दर्शनी ही गोळी घाटकोपर प्रशिक्षण केंद्रातूनच आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिवशी तिथे सकाळी प्रशिक्षण चालू असल्याचीही खातरजमा आम्ही करून घेतलेली आहे.”

हिरानंदानी किंवा पवई भागात गोळी येण्याचा आणि लोकांना आपले निशाणा बनवण्याचा हा पहिला प्रकार नाही आहे. गेल्या दहा वर्षात घडलेल्या काही घटना खालील प्रमाणे:

वर्ष घटना
२००६ हिरानंदानी येथील दानिष मलक याच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती.
मार्च २००६ तिरंदाज गावठाण, आयआयटी येथील गाडे यांच्या घरात तर मोरे यांच्या दुकानात छताला तोडून गोळीने प्रवेश केला होता.
एप्रिल २००८ पार्कसाईट येथे राहणाऱ्या आणि हिरानंदानीमध्ये घरकाम करणाऱ्या शारदाबाई खुटवड डी मार्ट येथून जात असताना त्यांच्या पायाला येवून काहीतरी लागल्याचे त्यांना जाणवले एक्सरे करून पाहिले असता ती गोळी असल्याचे स्पष्ट झाले.
२० जून २००८ आदिशंकराचार्य मार्गावरील एमटीएनएल कॉलोनीमधील सरस्वती इमारतीच्या चौथ्या माळ्यावर राहणाऱ्या सतींदरजीत कौर यांच्या घराच्या खिडकीच्या काचेला फोडून गोळी घरात सोफ्यावर जावून पडली.
नोव्हेंबर २००९ सैगलवाडी येथे राहणारे संदेश मोरे यांच्या घराचा पत्रा फोडून भिंतीला लागून गोळी पडली.
मार्च २०१० हिरानंदानीमधील अल्फा बिल्डींगच्या सिक्युरिटी केबिन, अग्निशामक साहित्याचे बॉक्स व पार्क असणाऱ्या कारच्या पाठीमागील काचेला फोडून गोळी सिटमध्ये जावून घुसली होती.
मे २०११ सैगलवाडी येथील विनोद खन्ना यांच्या घराचा पत्रा फोडून घरात प्रवेश.
२ नोव्हेंबर २०११ हिरानंदानीमधील इव्हीटा इमारतीमध्ये पोहचली होती गोळी.
मार्च २०१४ हिरानंदानी येथील सेनगुप्ता यांच्या आठव्या माळ्यावर असणाऱ्या घरात खिडकीची काच फोडून गोळीचा प्रवेश.
डिसेंबर २०१४ हिरानंदानीमधील एवेलोन इमारतीत घर पाहण्यासाठी आलेल्या जोडप्यांनी पार्क केलेल्या गाडीची पाठीमागील काच फोडून गोळी सीटवर जावून पडली. इमारतीच्या खांबावर गोळी लागली असल्याचे निशाण होते.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!