पवई तलावात पोहायला गेलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

पवई तलावात आपल्या मित्रांसोबत पोहायला आलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (सोमवारी) संध्याकाळी ६.२० वाजता पवई तलाव भागात घडली. सत्यम गुप्ता असे या मुलाचे नाव असून, तो विक्रोळी टागोरनगर येथील रहिवाशी होता. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विक्रोळी येथील टागोरनगर भागात राहणारे काही तरुण काल संध्याकाळी पवई तलाव भागात फिरण्यासाठी आले होते. “सर्व मित्र पवई गार्डनमध्ये फिरत असताना पवई तलावात पोहण्यासाठी उतरण्याचा त्यांना मोह झाला. सत्यम सुद्धा आपल्या मित्रांसोबत पाण्यात उतरला होता. त्याला पोहता येत नव्हते यातच पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

याबाबतची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि जीवरक्षक घटनास्थळी पोहोचले. जवळपास एकतास शोध घेतल्यानंतर साडे सातच्या सुमारास सत्यमला बाहेर काढण्यात यश आले.

त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

“तरुण पवई तलावात पोहण्यासाठी उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

“मुंबईत झालेल्या पावसामुळे पवई तलाव ओसंडून वाहू लागला होता. पवई तलावात सध्या मुबलक पाणीसाठा आहे, त्यातच पवई तलावात जलपर्णीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. तलावात उतरलेला सत्यम जलपर्णीमध्ये अडकून पडल्याने त्याला हालचाल करणे अशक्य होऊन, बुडून त्याचा मृत्यू झाला,” असे याबाबत बोलताना काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!