ऑनलाईन मोटारसायकल खरेदी करणे तरुणाला पडले महागात; गमावली तिप्पट रक्कम

सेकंडहॅन्ड मोटारसायकल ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या २५ वर्षीय तरुणाला ऑनलाईन फसवणूकीत ७२,००० रुपयांची टोपी लागली आहे. २५,००० रुपये किंमतीच्या त्या मोटारसायकल खरेदीत रस असणाऱ्या तरुणाला त्याच्या जवळपास तिप्पट रक्कम गमवावी लागली आहे. यासंदर्भात साकीनाका पोलिस भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

राजकमल सरोज (२५) हा टेकनिकल इंजिनिअर असून, वापरलेल्या वस्तू खरेदी-विक्रीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोटारसायकल शोधत होता. १५ जुलै रोजी सरोजला २५ हजार रुपयांच्या मोटारसायकलची एक जाहिरात तिथे दिसली. राजकुमारशेठ नामक एका व्यक्तीने तिथे ही जाहिरात टाकत, स्वत:ची आर्मीमध्ये असल्याची ओळख दिली होती. त्याची बदली झाली असल्यामुळे त्याला आपले वाहन विकायचे असल्याचे तिथे सांगण्यात आले होते.

सरोजला त्या मोटारसायकलीत रस असल्याने त्याने वाहन आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी शेठ यांच्या बँक खात्याचा तपशील त्यांना मागितला. वाहन कागदपत्रे आणि स्कूटरच्या होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला अतिरिक्त ३,१५० रुपये द्यावे लागतील. ही रक्कम ३००० आणि १५० अशा दोन स्वतंत्र व्यवहारात देण्यास सांगितले होते. असे सरोज यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

आर्मी कार्गो फी, लेट पेमेंट फी आणि स्कूटरच्या होम डिलिव्हरीच्या बहाण्याने वेगवेगळ्या संयोजनांचे स्वतंत्र व्यवहार करण्याच्या समान पद्धतीचा वापर करून ६५,६०७ रुपये शेठ याने भरण्यास सांगितले. एवढी रक्कम भरल्यानंतरही शेठने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यानंतर सरोज याला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेतली.

साकीनाका पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. “आम्ही तांत्रिक माहिती, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि बँकेकडून तपशील मागवला आहे,” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या बँकेचा कोणताही तपशील अनोळखी व्यक्तीला सामायिक करू नये. लष्कराच्या जवानांच्या नावावर अशा फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लष्करातील सैनिक इंटरनेटवर आपली वाहने विकत नाहीत आणि फसवणूक करणार्‍यांकडून याचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!