चांदीवलीत लवकरच उभे राहणार २५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय

स्थानिक शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून लवकरच चांदिवलीत ७ मजली सुसज्ज रुग्णालय पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार आहे. मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर धामणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाच्या कामासाठी हिरवा कंदील दिला आहे.

चांदीवली विधानसभा क्षेत्रातील लाखो नागरिकांना महानगरपालिकेची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी प्रयत्न सुरू केले असून, चांदीवलीतील संघर्षनगर येथे २०० ते २५० खाटांचे सुसज्य रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.

चांदीवली विधानसभा क्षेत्रात पाठीमागील काही वर्षांत मोठ्या झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे. संघर्षनगर परिसरात गोरेगाव, मालाड येथील वनविभागाच्या जागेवरील हजारो कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच महानगरपालिकेच्या सेवा सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. यात प्रामुख्याने आरोग्य सेवा महत्वाची असून त्यासाठी स्थानिक आमदार दिलीप लांडे सतत प्रयत्न करत आहेत.

वीस वर्षाच्या सत्तेला भेदत नगरसेवक ते आमदार असा पल्ला गाठलेले लांडे यांनी निवडून येताच नागरी सुविधांच्या कामांसाठीचा पाठपुरावा सुरू केला आहे. संघर्षनगर येथील महानगरपालिकेच्या एक लाख फूट आरक्षित भूखंडावर महानगरपालिकेचे भव्य रुग्णालय उभारण्यात यावे यासाठी त्यांनी महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. प्रशासकीय दरबारी याचा सतत पाठपुरावा सुरु असताना नुकतेच मनपा अधिकाऱ्यांनी या आरक्षित जागेची पाहणी केली.

मंगळवार, २४ डिसेंबरला लांडे यांनी मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांच्या कार्यालयात तातडीची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. “यावेळी सह आयुक्त सुनील धामणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत  रुग्णालयाच्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणाना सूचना दिल्या आहेत”, असे याबाबत बोलताना लांडे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “राजावाडीच्या धर्तीवर चांदीवलीमध्ये महानगरपालिकेचे २०० ते २५० खाटांचे भव्य आणि सुसज्ज रुग्णालय उभारले जाणार आहे. रुग्णालयासाठी साधारण ७ ते ९ माळ्यांची इमारत बांधण्यात येणार आहे.”

बैठकीला उपविभाग प्रमुख अशोक माटेकर, भास्कर पाटील, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, शाखाप्रमुख अनंत उतेकर, बाळकृष्ण गट्टे, महिला शाखा संघटिका प्रभावती पालव, धनश्री पवार, प्रयाग दिलीप लांडे तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!