अग्निशमन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हायको मॉलला नोटीस

शहरभरातील सर्व मॉल्सच्या तपासणीनंतर मुंबई अग्निशमन दलाने अग्निसुरक्षा उपायांच्या बाबतीत आढळलेल्या कमतरतेबद्दल मुंबईतील २९ मॉलला नोटिसा बजावल्या आहेत. या मॉल्समध्ये पवईतील हायको मॉलचा सुद्धा समावेश आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनुसार लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू झाल्यापासून हे मॉल्स अग्निसुरक्षेच्या मानदंडांपैकी फक्त काही अंशतः अनुपालन करणारे आढळले आहेत.

सिटी सेंटर मॉल, नक्षत्र मॉल (दादर), सबरिया मॉल (वांद्रे पश्चिम), ठाकूर शॉपिंग मॉल (कांदिवली), हाईको मॉल (पवई) आणि ड्रिम मॉल (भांडुप) सह २९ मॉल्सचा यात समावेश आहे. या मॉलना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस संबंधित विभागातील पालिकेच्या कार्यालयांकडे केली आहे.

मुंबई सेंट्रल परिसरातील सिटी सेंटर मॉलला मागील महिन्यात आग लागली होती. तब्बल ५६ तासानंतर ही आग नियंत्रणात आली होती. मॉलमधील अंतर्गत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे आग विझवताना अनेक अडथळे निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने शहर आणि उपनगरातील विविध मॉलची तपासणी केली.

तपासणीत २९ मॉलमध्ये काही ठिकाणी अवैध बांधकामे तर काही ठिकाणी अग्निसुरक्षा नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. ज्या मॉलमध्ये अवैध बांधकामे तसेच नियमांचे उल्लंघन करण्यात आले असेल त्यावर पालिकेच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस अग्निशमन दलाने केली आहे.

अग्निसुरक्षा अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी अग्निशमन विभाग वेळेवर तपासणी करते, पालन न केल्याबद्दल नोटिसा बजावते आणि त्या कालावधीत अधिग्रहण करणार्‍या किंवा विकासकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. तसे न केल्यास त्यांच्यावर न्यायालयात खटला चालविला जातो. गेल्या दोन वर्षांत ११७६५ गॅस सिलिंडर अवैध वापरासाठी जप्त करण्यात आले होते, अशी माहिती एमएफबीकडून मिळत आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!