प्रेमात ११ लाखाला गंडवले

पवई येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावर मैत्रीण असलेल्या महिलेने मदतीच्या नावाखाली ११ लाखाला गंडवले. विशेष म्हणजे त्याने युनाइटेड किंगडममध्ये (युके) असल्याचा दावा करणार्‍या आपल्या या मैत्रिणीला मदत करण्यासाठी आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले आहे.

२९ वर्षीय व्यक्ती मुंबई विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत होता. परंतु कोरोनाव्हायरस आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये तो नोकरी गमावून बसला असून सध्या बेरोजगार आहे.

डिसेंबरमध्ये या व्यक्तीला लंडनमधील एका महिलेकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. या महिलेने आपण वाईनेरीमध्ये काम करत असल्याचे सांगितले. दोघे एकमेकांशी बोलू लागल्यानंतर काही दिवसांनी फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि दोघे व्हॉट्सअॅपद्वारे बोलू लागले. “काही दिवसाने त्या महिलेने तक्रारदार याला सांगितले की, ती भारतात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहे आणि तिला त्याच्या मदतीची आवश्यकता आहे,” पोलिसांनी सांगितले.

महिलेच्या उद्देशाबाबत कोणतीही शंका न वाटल्याने त्यांची चर्चा पुढे होत राहिली. महिलेने तिला मत्स्य व्यवसायासाठी जमीन विकत घ्यायचे असल्याबाबत त्याला सांगितले. काही दिवसांनंतर, त्या महिलेने त्याचा पत्ता विचारला आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी ती ५०,००० पौंडसह एक महागडी भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले.

कस्टम अधिकारी

पोलीस पुढे म्हणाले, “काही दिवसांनंतर त्याला एका महिलेने फोन करून स्वत:ची कस्टम अधिकारी म्हणून ओळख करून देत त्याने बेकायदेशीरपणे परकीय चलन आयात केले असून, त्याची कृती भारतीय अधिकाऱ्यांनी पकडली आहे. त्याला हे पैसे हवे असल्यास कर रुपी दंड भरावा लागेल असे सांगितले.

कस्टम कर्मचारी म्हणून स्वतःची ओळख सांगणार्‍या महिलेने त्या व्यक्तीला ईमेल आयडी मागितला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लेटरहेडसह एक ईमेल त्याला प्राप्त झाला. ज्यामध्ये असे सांगितले गेले होते की, पैसे बेकायदेशीरपणे आयात केले गेले आहेत आणि कारवाई टाळण्यासाठी दंड भरावा लागेल.

हा ईमेल खरा असल्याचे समजत त्याने ब्रिटीश महिलेशी संपर्क साधला. त्या महिलेनेही त्याला फी भरण्यास सांगितले आणि ती भारतात आल्यावर रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे नसल्याने त्याने मित्र आणि नातेवाईकांकडून कर्जावर पैसे घेतले. आपल्या आई व पत्नीचे दागिनेही विकले आणि ते पैसे दिलेल्या खात्यात जमा केले.

दंड भरल्यानंतरही पार्सल न मिळाल्याने संशय आल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!