बर्थडे पार्टी साजरी करायला गेलेल्या इसमाचा विहार तलावात बुडून मृत्यू

@रविराज शिंदे

प्रातिनिधिक छायाचित्र

साई बांगुर्डा येथे पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी विहार तलाव येथे मित्रांसोबत गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली आहे. अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांचा शोध सुरु असून, त्यांना अजूनपर्यंत यश लाभले नाही.

मुंबईमध्ये मुसळधार पावसाने गेल्या तीन दिवसापासून हाहाकार माजवला आहे. तलाव तसेच समुद्रात जाण्यास पोलीस प्रशासन मुंबईकरांना मज्जाव करत असतानाही काही जण जीवाची पर्वा नकरता तलाव व समुद्रात उतरून आपला जीव गमावल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी पवईतील ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे हे मित्रांसोबत विहारलेक तलाव भागात बर्थडे पार्टी साजरी करण्यासाठी गेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

संभाजी हे आपल्या परिवारासहित पवईतील जयभीमनगर परिसरात राहतात. विलेपार्ले येथे बिस्कीट कंपनीत काम करणारे संभाजी हे रविवारी मित्रांसहित बर्थडे साजरी करण्यासाठी गेले होते. पार्टी सुरु असताना ते विहार तलावात पोहण्यासाठी उतरले. खूप वेळ झाल्यानंतरही तलावातून बाहेर न-आल्याने मित्रांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र त्यांचा कोठेच पत्ताच लागला नाही.

यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर काल संध्याकाळी घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाने धाव घेत शोध कार्य सुरू केले. सोमवारी उशिरापर्यंत शोध कार्याला यश आले नव्हते. मुसळधार पावसामुळे शोधकार्यास अडथळा येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले असून, मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes