रहेजा विहार येथे इमारतीवरून उडी मारून वृध्देची आत्महत्या

चांदिवली, रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्देने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत (७२) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धेचे नाव असून, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आपल्या परिवारासोबत रहेजा विहार येथील मेपल लिफ इमारतीत राहत. वृद्धपणासोबतच गेल्या काही वर्षापासून त्या मधुमेहाच्या (डायबेटिस) आजाराने त्रस्त असल्याने भरपूर तणावाखाली वावरत असत. आजारपणाचा त्रास होत असल्याचे  त्यांनी आपल्या परिवाराला सुद्धा बोलून दाखवले होते.

‘घरात कोणी नसल्याचा फायदा घेत राऊत आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडल्या, मात्र समोर ग्रिल लावलेली असल्यामुळे त्यांनी शिडीवरून उतरत पाठीमागील बाजूस असणाऱ्या डक्टमधील जागेतून उडी मारली. मात्र खालच्या माळ्यावर असणाऱ्या सज्जेवर त्यांचे डोके आपटून गंभीर जखमी होवून सातव्या मजल्याच्यावर असणाऱ्या सज्ज्यावर अडकून पडल्या’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

‘आजाराला कंटाळून गेल्याचे आपल्या परिवाराला सांगताना तिने आत्महत्या करण्याची इच्छा होत असल्याचे सुद्धा बोलून दाखवले होते,’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांना उतरवून राजावाडी रुग्णालयात नेले असता, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

युनिट दहाचे पोलिस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी बातमीला दुजोरा देताना सांगितले की, ‘एक वृद्ध महिलेने आपल्या राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली असून, पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.’

यासंदर्भात अपमृत्युची नोंद करत पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes