एस विभाग हद्दीत ७५५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; १८० जण कोरोनामुक्त

कोरोना पॉझिटिव्ह@अविनाश हजारे – मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागांतर्गत येणाऱ्या पवई, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, नाहूर या भागात आतापर्यंत ७५५ रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील १८० जण कोरोनामुक्त झाले असून, डिस्चार्ज देऊन त्यांना घरी पाठवले आहे. तर २१ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पालिकेच्या १८ मे रोजीच्या यादीतून ही गोष्ट उघडकीस आली आहे.

पालिका एस विभागाच्या यादीनुसार पॉझिटिव्ह मिळालेल्या ७५५ बाधितांपैकी १४५ बाधित हे ‘एस’ विभागातील नसले तरी या हद्दीत ते ट्रेस झाले आहेत. एकूण ३७५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका आठवड्याचा आढावा

सोमवार ११ मे रोजी एस विभागात एकूण २९ बाधित आढळून आले होते. मंगळवार, १२ रोजी ३१ पॉझिटिव्ह मिळून आले. बुधवार १३ मे रोजी ५५, तर गुरुवार १४ मे रोजी ४३ लोकांना लागण झाल्याचे समोर आले. शुक्रवार १५ मे आणि शनिवार १६ मे रोजी अनुक्रमे ५२ आणि ४० बाधितांची यात भर पडली. यात घट होत रविवार १७ मे रोजी केवळ ०९ बाधितांची नोंद झाली होती. सोमवार १८ मे रोजी पुन्हा परिसरात ५९ बाधित आढळून आले आहेत. यानुसार ११ मे ते १८ मे पर्यंतच्या आठ दिवसाच्या कालावधीत एस विभाग हद्दीत एकूण ३१८ नवे बाधित सापडले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढतच जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय, कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस यांचा समावेश

पालिका एक विभागात पोलीस, शासकीय कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांची मोठी वस्ती आहे, त्यामुळे येथे काम करताना बाधित झालेल्यांची संख्या सुद्धा या विभागात मोठी आहे. आतापर्यंत मिळालेल्या बाधितांपैकी वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या ३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ०६ महानगरपालिका कर्मचारी आणि तब्बल २३ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

१२९ हाय रिस्क कॉन्टॅक्ट

आकडेवारीकडे पाहता एस विभाग हद्दीमध्ये कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ होताना दिसत असून, लोकांमध्ये या आजाराला घेऊन गांभीर्य नसल्याचेही लक्षात येत आहे. छोट्या छोट्या कामांसाठी किंवा फिरायला लोक सर्रासपणे बाहेर पडत आहेत. याचीच परिमिती म्हणून एस विभागात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. कम्युनिटी ट्रान्स्फरमुळे ३७५ बाधित या विभागात मिळून आले आहेत. तर १२९ बाधित हे हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. ३१ बाधित हे नॉट ट्रेसेबल असून, त्यांचा शोध सुरु आहे.

सुरुवातीच्या काळात पोलिसांकरवी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना लाठीचा प्रसाद मिळत असे, परंतु आता वैतागून त्यांची कारवाईही कमी झाल्याने लोक आता बिनधास्त बाहेर पडत आहेत.

लोकांच्या जनजागृतीसाठी सुरुवातीपासून पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. परंतु, काही बेजबाबदार लोकांमुळे इतर लोकांवरही विनाकारण हे संकट बळावले आहे. लोकांनी आतातरी सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे” विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग)

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!