केसांच्या प्रत्यारोपणानंतर ५० तासांनी व्यावसायिकाचा मृत्यू

चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिकाने चिंचपोकळी येथील खाजगी रुग्णालयात केलेल्या केसांच्या प्रत्यारोपणानंतर ५० तासांनी शनिवारी त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील लॉजिस्टीक व्यवसायाचे मालक श्रवण कुमार चौधरी यांना शुक्रवारी चेहऱ्यावर सूज येवून, गंभीर श्वासोच्छवासाची तक्रार जाणवू लागल्यानंतर हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी सकाळी ६.४५ वाजता मृत्यू झाला.

साकीनाका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी यांच्यावर ९५०० केसांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १५ तास चिंचपोकळी येथील खासगी रुग्णालयात शुक्रवार, ७ मार्च रोजी करण्यात आली होती. ज्यासाठी ५ लाख रुपये देण्यात आले होते. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चांदिवली, नहार अमृतशक्ती येथे ते पत्नी, तीन मुले (दोन मुली आणि एक मुलगा – १२ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील) आणि आपल्या पुतण्यांसोबत राहत होते. या शस्त्रक्रियेबाबत त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीच माहिती दिली नव्हती. त्यांच्या चालकानी त्यांना रुग्णालयात नेले होते.

‘माझे काका सकाळी ९ वाजता घरातून निघाले होते आणि रात्री उशिरा परत येईन असा निरोप त्यांनी निघताना दिला होता. सोबत केवळ चालकाला घेवून गेले होते. कित्येक तास चाललेल्या शस्त्रक्रियेवेळी कुटुंबातील कोणीच सदस्य तेथे उपस्थित नव्हता. ८ मार्चला दुपारी १ वाजता त्यांनी गंभीर श्वासोच्छवासाच्या त्रासाची तक्रार केली आणि संपूर्ण चेहराही सुजला असल्याने त्यांना त्वरित हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असे चौधरी यांचे पुतणे त्रिलोक कुमार यांनी सांगितले.

काकाच्या लॉजिस्टीक फर्ममध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणारे त्रिलोक आपल्या अजून एक भावासोबत चौधरी यांच्यासोबत राहतात. ‘काका एक पारिवारिक व्यक्ती होते. संपूर्ण कुटुंब त्यांच्या या अचानक जाण्याने धक्क्यात आहे. माझ्या काकांनी ९५०० केसांच्या रोपणासाठी १५ तास चाललेल्या शास्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपये खर्च केल्याची माहिती सुद्धा नुकतीच समोर आली आहे. सध्या त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी आम्ही राजस्थानमधील नागोर जिल्ह्यात आहोत. आम्ही परत आल्यावर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेवू’ असेही त्रिलोक म्हणाले.

‘प्रत्यारोपण प्रक्रिया करण्यात आलेले रुग्णालय अधिकृत आहे की नाही, फक्त वैद्यकीय सर्जनला शस्त्रक्रिया करण्याचे अधिकार आहेत. एवढ्या दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती का? याची आम्ही माहिती मिळवत आहोत, असे याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, ‘अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली आहे आणि गुन्हे प्रक्रिया कायद्याच्या कलम १७४ अंतर्गत (एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यास पोलिसांना चौकशी करण्याचा राज्य सरकारकडून मिळालेला अधिकार) त्यांचा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे का याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.’

‘प्राथमिक शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जेजे रुग्णालयात अधिक प्रक्रिया सुरु असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नक्की मृत्यू कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होईल ज्याच्यावरून पुढील कारवाई करण्यात येईल’, असेही यावेळी बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!