पवईत आयुष्य फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी रक्तदान

@अविनाश हजारे

पवई येथील आयुष्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पवईच्या माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नं. २ येथील विश्वशांती बुद्ध विहारमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात तरुणांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या शिबिरात तब्बल २७४ रक्तदात्यांनी रक्तदान करत एक नवा विक्रम केला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे पालिका रुग्णालयाच्या ट्रॉमा हेल्थ केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या २ वर्षात महाराष्ट्रावर आणि देशावर कोरोनाचे संकट आले असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांना रक्ताची भासत असलेली कमतरता भरून काढण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना आदींना रक्तदान शिबिरे लावण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने येथील आयुष्य फाऊंडेशनने सामाजिक दायित्व ओळखून हा उपक्रम हाती घेतला. संस्थेच्या या उपक्रमाला तरुण रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“नागरिकांचा विशेषतः तरुणांचा लक्षणीय असा हा प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा असून, यापुढेही असेच विविध लोकोपयोगी उपक्रम घेऊन येऊ”, असे यावेळी बोलताना फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रतिक वानखेडे यांनी सांगितले.

यावेळी रक्तदात्यांना भेटवस्तू म्हणून सन्मानपत्रासह हेल्मेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समद सोलकर, निखिल खंडागळे, नितेश वानखेडे यांसह अनेक कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!