पवई पोलीस ठाणेच्या वपोनि पदी आबुराव सोनावणे

पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) सुधाकर कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर कोविड महामारीमुळे अनेक दिवस रिकाम्या असणाऱ्या या पदावर पवई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विजय दळवी यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता या पदावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

सोनावणे यांनी यापूर्वी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यासह, विशेष शाखांमध्ये सुद्धा आपले कर्तव्य निभावले आहे. गुन्हे शाखेमध्ये सुद्धा त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. मुंबईतील सर्वांत मोठी समस्या असणाऱ्या अंमलीपदार्थ नशेखोरी सारख्या समस्येला रोखण्यासाठी त्यांनी चांगलेच कार्य केले असून, सध्या मुंबई परिसरात होत असणाऱ्या कारवाईत सुद्धा त्यांचे योगदान राहिले आहे. दांडगा अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी नुकताच पवई पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी पवई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून काम पाहिले आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात सुद्धा ते पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यामुळे पवईसह साकीनाका आणि आसपासच्या भागात त्यांचा दांडगा संपर्क असून, गुन्हेगारी रोखण्यास यशस्वी व्यक्तिमत्व पवईला मिळाल्याची चर्चा आहे.

पवई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारा परिसर हा तसा शांत असला तरी, आयआयटी मुंबई सारख्या संवेदनशील ठिकाणावर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. दर दोन दिवसाला घडणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी जनजागृती आणि लक्ष देणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

वपोनि सोनावणे यांनी पदभार स्विकारल्यानंतर पवईतील विविध पक्ष- संघटनेच्या व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ‘पवई दैनिक पत्रकार संघ’ या पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा त्यांची भेट घेऊन पवईतील नानाविध समस्यांवर चर्चा केली आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!