मार्केट सिग्नलजवळ मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवले; गंभीर जखमी

@अविनाश हजारे

वई गणेशनगर येथे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने एका १९ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच, अशाच एका भरधाव मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवल्याची घटना आयआयटी मार्केट येथे घडली आहे. वेगाची ही झिंग फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना कनोजिया (२०) या तरुणीच्या जीवावर बेतता बेतता राहिली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजता कामावर जात असताना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मार्केट सिग्नलवर हिनासोबत हा अपघात घडला. स्थानिकांच्या मदतीने त्वरित तिला जवळच्या पवई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धडक दिल्यानंतर मुजोर बाईकस्वार पसार झाला असून, त्याचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू असल्याचे पार्कसाईट पोलिसांनी सांगितले.

येथे घडलेली ही पहिली घटना नसून, काही दिवसांपूर्वी येथील चंदननगरमधील रहिवाशी असलेल्या प्रमिला सिंग या आपल्या मुलांना शाळेत घेण्यासाठी जात असताना याच सिग्नलवर त्यांना एका भरधाव टेम्पोने धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. येथून भरधाव धावणाऱ्या आणि विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नसल्यामुळे येथे लहान-मोठे अपघात हे नित्याचे बनले असून, याला रोखण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक प्रशासन याप्रकरणी कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

जेव्हीएलवरून भरधाव धावणाऱ्या वाहनचालकांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी मार्केट सिग्नलजवळ गतिरोधक आणि पूर्णवेळ वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

‘सिग्नलवर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी फुट ओव्हर ब्रिजची सोय आहे, तरीही अनेक रहिवाशी सिग्नलवरूनच रस्ता ओलांडतात. प्रत्यक्षात वाहनांना आयआयटीमध्ये येण्या-जाण्यासाठी सिग्नलची सोय आहे, मात्र तेथून पादचारी रस्ता ओलांडत असल्यामुळे अपघात होणे स्वाभाविक आहे.’ असे याबाबत बोलताना एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes